लॉकडाऊनमध्ये सगळ्याच मालिकांची चित्रिकरणं थांबली. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ती काळजी घेतली गेली. त्यालाही आता दोन महिने उलटले. कलाकार घरी बसून कंटाळले. पण अर्थातच चित्रिकरणाची परवानगी मिळाल्याशिवाय ही शूट पुढे सुरू होणं अशक्य आहे. फेडरेशन ऑफ साऊथ सिनेएम्प्लॉइज असोसिएशन आणि सिंटा म्हणजे सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन याच्या बैठकाही होऊ लागल्या आहेत.


साधारण जुलैमध्ये शूट सुरू होणार अशी चर्चा आहे. अर्थात राज्य सरकार, केंद्र सराकर काय निर्णय घेतं त्यावरही अवलंबून असणार आहे. पण साधारणपणे जर ही चित्रिकरणं जुलैमध्ये सुरू झाली तर चित्रिकरण स्थळी काय काळजी घ्यावी लागणार याच्या बैठका सुरू आहेत. असं असताना आपल्या मराठी टीव्ही इंडस्ट्रीने त्या पुढचं पाऊल टाकलं आहे. क्रिएटिव्हीटी असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही हेच यातून दिसंत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे एकिकडे सर्व कलाकार घरी बसून आहेत. आता आपल्याकडे म्हणजे मराठी टीव्ही इंडस्ट्रीत यावरच एक मालिका येते आहे. असं झालं तर लॉकडाऊनमध्ये सुरू होणारी ही टीव्ही इंडस्ट्रीच्या इतिहासातली पहिली मालिका असेल.





या मालिकेतले सगळे कलाकार सध्या आपआपल्या घरातूनच शूट करणार आहेत. या मालिकेचं नाव असणार आहे आठशे खिडक्या नऊशे दारं. यात अनेक कलाकार असणार आहेत, त्यात मुख्य भूमिकेत असणार आहेत दिग्दर्शक अभिनेते मंगेश कदम आणि लीना भागवत. याशिवाय समीर चौघुले, विशाखा सुभेदार, सखी गोखले, सुव्रत जोशी, आनंद इंगळे आदी कलाकार काम करणार आहेत. मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत श्रीरंग गोडबोले. मालिकेची थीमही लॉकडाऊन अशीच असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या श्रीरंग गोडबोले करत असलेल्या स्वल्पविराम या लाईव्ह सेशन्समधूनच त्यांना ही कल्पना सुचली आहे.




याबद्दल माहीती देताना या मालिकेचे दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले म्हणाले, हा संपूर्णत: नवा प्रयोग असेल. कलाकार आपआपल्या घरातूनच या एपिसोडचं शूट करतील. तुम्हाला ती पाहताना नेहमीच्या मालिकेसारखीच वाटेल. अशा प्रकारचाच प्रयोग मराठीत पहिल्यांदाच होतो आहे.


मालिकेचे प्रोमो लवकरच सुरू होतील. येत्या 18 मेपासून ही मालिका सोनी मराठीवर येणार आहे. सोनी मराठीच्या या निर्णयामुळे लॉकडाऊनमध्ये नवी मालिका करणारं ते एकमेव चॅनल ठरणार आहे.



 Rajesh Tope | रुग्णांच्या कुटुंबियांची लूट केल्यास कारवाई करणार : राजेश टोपे