मुंबई : लॉकडाऊनमध्ये नाटकं बंद झाली आणि हातावर पोट असलेल्या रंगमंच कामगारांची अडचण झाली. अर्थात त्यांच्या मदतीसाठी लगेच समाजातली अनेक मंडळी धावून आली. कलाकार फॉर महाराष्ट्र या अंतर्गत कलाकारांनी मदत उभी केली आणि रंगमंच कामगार संघाशी संवाद साधून आवश्यक रंगमंच कामगारांना शिधा पोचवला गेला. एकिकडे हे काम नेटानं चालू असताना याच रंगमंच कामगारांसठी निधीचं आवाहन केलेल्या एका गटामुळे वाद उद्भवला आहे. विशेष म्हणजे या गटात प्रशांत दामले, पुरुषोत्तम बेर्डे, राजन ताम्हाणे आदी मंडळी असल्यामुळे नावांच्या विश्वासार्हतेमुळे जमलेल्या निधीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. रंगमंच कामगार संघ आणि मराठी नाटक समुह या गटातला हा विसंवाद इतका टोकाला पोहोचला आहे की हा गट आपला आडमुठेपणा सुरुच ठेवणार असेल तर कोणीही रंगमंच कामगार त्यांची मदत स्वीकारणार नाही अशी भूमिका संघाने घेतली आहे.


याबद्दल बोलताना रंगमंच कामगार संघाचे अध्यक्ष किसोर वेल्ले म्हणाले, 'आमच्या संघात रंगभूषाकार, वेशभूषाकार, प्रॉपर्टीवाले, इस्त्रीवाले, ड्रायव्हर आदी सगळी मंडळी येतात. आमच्या संघात 777 सदस्य आहेत. आम्हाल लॉकडाऊन काळात अनेक जाणत्या अजाणत्यांनी मदत केली. त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. पण मराठी नाटक समुहाने रंगमंच कामगारांसाठी मदतीचं आवाहन केलं आहे. त्याबद्दलही आम्ही आभारीच आहोत. आमचं म्हणणं इतकंच आहे, की तुम्ही जी मदत करणार आहात ती तुम्हीच करा. पण ती करताना आमच्यापैकी एकाशी संवाद साधा. समजा 100 गरजू असतील. आणि तो समुह 50 जणांना मदत करणार असेल तर उरलेल्या 50 जणांना मदत आम्ही करू. म्हणजे, सर्वांना समान मदत जाईल. संबंधित समुहाने वेचून 50 जणांना मदत केली तर आमच्या संघान असंतोष निर्माण व्हायची शक्यता आहे. शिवाय काहींना डबल मदत जायचीही शक्यता आहे. असं होऊ नये म्हणून आम्ही वारंवार या गटाच्या लोकांशी संपर्क साधायचा प्रयत्न करतोय. आता संबंधित समुह इतकी आडमुठी भूमिका घेणार असेल तर त्यांची मदतच नको या विचारांशी आम्ही चर्चा करतो आहोत.'


BLOG | चिंटूसाब.. काळापुढचा कपूर!


याबद्दल रंगमंच कामगार संघातर्फे रीतसर लेखी पत्र लिहिण्यात आले आहे. यात संबंधित मराठी नाटक समुहामध्ये झालेल्या संभाषणाचा निषेधही नोंदवण्यात आला आहे. संबधित समुहातर्फे रंगमंच कामगारांना नदत करण्याचं आव्हान मार्चमध्ये करण्यात आलं होतं. आर्थिक मदतीसाठी ज्येष्ठ लेखक शेखर ताम्हाणे, रंगकर्मी आशीर्वाद मराठे यांचे अकाऊंट नंबर्स देण्यात आले होते.


यावर मराठी नाटक समुहातील मंडळींशीही संपर्क साधण्यात आला. नाव न सांगण्याच्या अटीवर या व्हॉट्सअप समुहातील ज्येष्ठ सदस्य म्हणाले, 'हा निव्वळ विसंवाद आहे. आमच्याकडे अनेकांनी मदत जमा केलेली आहे. ती योग्य लोकांच्याच हातात जाईल. रंगमंच संघाला बाजूला सारणे हा यातला हेतू नाही. ही मदत कधी करायची याबाबत अद्याप आमच्यातच अनिश्चितता आहे. कदाचित लॉकडाऊन उठल्यानंतरच्या महिन्याभरात मदत लागू शकते. अशावेली ती करावी का की आधीच करावी याबद्दल चर्चा सुरू आहे. आम्ही रंगमंच कामगार संघाशीही बोलूच. केवळ कम्युनिकेशन गॅपमुळे ही अडचण आली आहे. संबंधित मंडळी लवकरच संघाशी बोलतील आणि हा वाद मिटेल अशी खात्री आहे, '


Rishi Kapoor Passes Away | ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर मरिन लाईन्सच्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार