मुंबई : लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा फटका नाट्यसृष्टीला बसला. एकिकडे लॉकडाऊनमुळे नाट्यगृहं बंद झाली आणि कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे नाटकं कधी सुरु होणार तेही कळेनासं झालं. मार्च ते ऑगस्ट असे जवळपास पाच महिने रंगकर्मी घरी बसून होता. याकाळात नाट्यपरिषदेने रंगकर्मींना मदत केलीच. पण तात्पुरती मदत न करता अशांसाठी ठोस मदत व्हावी म्हणून आता नाट्यपरिषदेने नाट्यकर्मी कल्याण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून नाट्यपरिषद आपल्या घटकसंस्थांकरवी रंगमंच कामगार संघ, निर्माता संघ, कलाकार संघ यांना मदत करत आहे, अशी माहिती परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी दिलीय. ते म्हणाले, ' परिषदेने एक कोटी 20 लाखांची मदत केली आहेच. शिवाय, गेले पाच महिने रंगमंच कामगार, निर्माते, कलाकार या सर्वच गरजूंना अन्नधान्याची किटस आम्ही दिली.. देत आहोत. आता एकिकडे प्रयोग थांबले आहेत. गणपती येतायत. ते लक्षात घेऊन गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट यांनी 15 लाखांच्या किट्सचं वाटप गरजू नाट्यकर्मींना केलं आहे. 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या काळात हे वाटप केलं जात आहे. '
आवश्यक सर्वांना मदत होत असताना, तात्पुरती मदत न करता कायमस्वरुपीच या मदतीचा एक प्रवाह आखावा म्हणून नाट्यकर्मी कल्याण केंद्राची स्थापना नाट्यपरिषद करणार आहे. "या मदतीचा ओघ कायम रहावा म्हणूनच हे कल्याण केंद्र स्थापन करण्यावर एकमत झालं आहे. यात रंगकर्मींची मुलं, अडचणीत आलेले कलाकार, कुणाची आरोग्याची काही तक्रार असेल तर अशी मंडळी या सर्वांना या कल्याण केंद्रातून मदत होऊ शकेल. ही बोलणी प्राथमिक स्तरावर असली तरी या विचारावर आमचं एकमत झालं आहे,' असं कदम यांनी 'एबीपी माझा'ला सांगितलं.
गोदरेज कंझ्युमर्स यांच्याकडून आलेली किटस जवळपास हजार ते बाराशे जणांना वितरीत करण्यात येत आहेत. यात नाट्यपरिषदेचे अध्ययक्ष प्रसाद कांबळी, निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर, कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे यांसह रंगमंच कामगार संघाचे रत्नकांत जगताप, व्यवस्थापक संघाचे गोट्या सावंत आदींचा मोलाचा सहभाग आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
हिंदी सिनेमांमुळे ओटीटीच्या तोंडाला फेस, अनेक कंपन्यांनी चित्रपट घेण्याचं थांबवल्याची चर्चा
65 वर्षांवरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी : अमित देशमुख
'राजा गणपती'.. शंकर महादेवन, हेमा मालिनी, तनिष्क बागची यांची गणेश भक्तांसाठी भेट