मुंबई : छोट्या पडद्यावर सतत काही ना काही गोष्टी घडत असतात. काही मालिका बंद होतात तर त्यांची जागा नव्या मालिका घेत असतात. आताही झी मराठीवर एक मालिका बंद होऊन नवी मालिका सुरू होते आहे. बंद होणाऱ्या मालिकेचं नाव आहे रात्रीस खेळ चाले आणि त्याजागी नवी मालिका येते आहे देवमाणूस. या नव्या मालिकेचे प्रोमो आता टीव्हीवर आले आहेत. या प्रोमोची सुरूवातीपासूनच चर्चा झाली आहे. असे प्रोमो टीव्हीवर दाखवावेत का? असा विषय सध्या जोर पकडू लागला आहे.


देवमाणूस ही एक थ्रिलर मालिका आहे. देवमाणसाच्या चेहऱ्या आड लपलेला राक्षसी चेहरा यात दाखवण्याचा प्रयत्न आहे. ही एक मर्डर मिस्ट्री आहे. या मालिकेचा प्रोमोही तसाच थरारक झाला आहे. एक महिला डॉक्टरला मूल होत नसल्याबद्दल सांगते. डॉक्टर म्हणतो मी आहे ना. काही काळानंतर आपल्या घरच्यांना संशय आल्याचं ती महिला डॉक्टरांना सांगते. डॉक्टर चल बघू.. तुला चेक करू असं म्हणत तिला खोलीत नेतात आणि तिला तपासण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यावर सपासप वार करतात. असा हा प्रोमो आहे.

याच प्रोमोवरून सध्या सोशल मीडियावर वाद सुरू आहे. टीव्ही मालिका हे घरातले अबालवृद्ध बघत असतात. अशी थेट दृश्य दाखवल्याने लहान मुलांवर परिणाम होतो असं एक मत प्रेक्षक राजन पाटील यांनी मांडलं आहे. हा प्रोमो आल्यानंतर आपली नात आपल्याला अनेक प्रश्न विचारू लागली असंही त्यांनी यात म्हटलं आहे. त्यामुळे प्रोमो करायला हरकत नाही. मालिका गूढ, थरारक असेल तर तेही चालेल. पण थेट असा रक्तपात नको असं त्यांचं म्हणणं.

गौरव देशमुख यांनीही अशा प्रोमोकडे लक्ष वेधलं आहे. असा रक्तपात दाखवायची गरज नाही. या मालिकेची वेळ रात्री साडेदहाची आहे. जिथे सगळं कुटुंब टीव्हीसमोर येऊन बसलेलं असतं. अशावेळी सूचक गोष्टी दाखवण्यावर भर हवा असं ते म्हणतात. तर रेश्मा भिसे यांना मात्र ते योग्य वाटतं. त्या म्हणतात, आता अनेक सिनेमात, मालिकात अशी दृश्य असतात. वेबसिरीजमध्ये तर त्याहीपेक्षा वाईट दृश्य असतात..  प्रोमो हा चित्ताकर्षक असतो. याचा अर्थ मालिकेत सतत असं काहीतरी असेलच असं नाही.

या मालिकेच्या प्रोमोची चर्चा जोरदार आहे. टीव्हीवर असा कंटेंट घालवावा की नाही यावर सध्या चर्चा आहे. लोकांना हा प्रोमो आवडला नसेल तर ते तक्रारही करूच शकतात. देवमाणूस ही मालिका सुरूवातीपासूनच चर्चेत आली आहे, असं म्हणायला हरकत नाही.