मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग आता अतिशय वेगानं फैलावू लागला आहे. काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आलेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा अतिशय झपाट्यानं वाढू लागली आहे. अशा या विषाणूच्या विळख्या एक अतिशय लोकप्रिय आणि लाडकी सेलिब्रिटी जोडीही आली आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती या जोडिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आपण, घरीच विलगीकरणात असल्याचं सांगितलं. 


कोरोना संसर्ग झालेली ही जोडी म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती, अभिनेता उमेश कामत. 'दुर्दैवानं उमेश आणि मला कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही स्वगृहीच विलगीकरणात आहोत. गरजेची सर्व औषधं आणि आवश्यक ती काळजी आम्ही घेत आहोत. सर्व नियमांचं पालनही करत आहोत. कृपया मागील आठवड्यात आमच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करा किंवा काही दिवस विलगीकरणात राहा', असं आवाहन या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं.



 


प्रिया आणि उमेशनं हल्लीच त्यांच्या एका अत्यंत गाजलेल्या वेब सीरिजच्या पुढील भागाचं चित्रीकरण सुरु केलं होतं. याव्यतिरिक्त 'दादा एक गुड न्यूज आहे', या नाटकाच्या प्रयोगासाठीही त्यांचे दौरे सुरु होते. प्रिया आणि उमेशला कोरोनाची लागण झाल्याचं कळताच चाहत्यांनीही या जोडीला प्रतिक्रियांच्या माध्यामातून त्यांचं प्रेम देत त्यांच्यापोटी काळजीही व्यक्त केली आहे.