Aamne Saamne : खुसखुशीत मनोरंजनाची मेजवानी घेऊन आलेल्या ‘आमने सामने’ (Aamne Saamne) या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं हे धमाल विनोदी नाटक रविवार 15 मे ला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे आपला शतक महोत्सवी आनंद सोहळा साजरा करणार आहे. विनोदी अंगानेसुद्धा अनेक महत्त्वाचे विषय मांडता येतात, हे दाखवून देणाऱ्या ‘आमने सामने’ या नाटकातून लग्नसंस्थेवर मार्मिकरित्या भाष्य करण्यात आले आहे. येत्या रविवारी 15 मे ला गडकरी रंगायतनमध्ये साजऱ्या होणाऱ्या शतक महोत्सवी प्रयोगाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘झी नाटय गौरव’, आणि ‘मटा सन्मान’ सोहळयात सर्वोत्कृष्ट नाटकासहित सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री अशा सर्व पुरस्कारांवर या नाटकाने आपले नाव कोरले आहे. आगामी सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारांमध्ये सुद्धा सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता, नेपथ्य आणि प्रकाशयोजना अशी 8 नामांकने या नाटकाने पटकावली आहेत.
आंतरराष्ट्रीय संमेलनात निवड
विशेष म्हणजे नाटकाची आगामी आंतरराष्ट्रीय संमेलनात ही निवड झाली असून, यानिमित्ताने ‘आमने सामने’ नाटकाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील न्यू जर्सी अटलांटिक सिटी येथे होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात (BMM 2022 covention ) तसेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे 22,23,24 सप्टेंबर 2022 रोज़ी होणाऱ्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनातही (AAMS 2022) ‘आमने सामने’ नाटकाची निवड झाली आहे.
नाटक 500 प्रयोगांचा सुद्धा टप्पा गाठेल!
‘आमने सामने’ या नाटकाच्या शतकी महोत्सवी वाटचालीबद्दल आनंद व्यक्त करताना अभिनेते मंगेश कदम यांनी आंतरराष्ट्रीय संमेलनात नाटकाची झालेली निवड आमचा हुरूप वाढवणारी असल्याचे सांगितले. नाटकाला मिळत असलेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद पाहता हे नाटक 500 प्रयोगांचा सुद्धा टप्पा गाठेल, असा विश्वास व्यक्त केला.
मंगेश कदम, लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर यांच्या अभिनयाने रंगलेल्या ‘आमने सामने’ या दोन अंकी नाटकात मागच्या पिढीने काळानुसार नव्याचा स्वीकार करायला हवा हा विचार रंजकरीत्या मांडला आहे. दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांनी लग्नासारखा महत्त्वाचा विषय हाताळत प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले आहे. सादरकर्ते अवनीश व अथर्व प्रकाशित या नाटकाची निर्मिती ‘नाटकमंडळी’ यांनी केली आहे.
हेही वाचा :
- Deepika Padukone : Louis Vuitton ब्रॅंडची दीपिका पदुकोण ब्रँड अॅम्बेसेडर; अशी निवड झालेली पहिलीच भारतीय महिला
- Jacqueline Fernandez : ‘फक्त IIFA पुरस्कारांत सामील होऊ द्या!’, ईडीने पासपोर्ट जप्त केल्याने जॅकलिनची कोर्टात धाव!
- Cannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर दिसणार हिना खानचा जलवा! ‘कान्स’मध्ये सामील होणार टीव्ही अभिनेत्री!