Bebhan : मराठी सिनेसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात असून, हिंदी सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावणारे कलाकारही आता मराठी सिनेसृष्टीकडे वळत असल्याचे आपण पाहिले आहे. आता यामध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे आणि ते नाव आहे अनुपसिंग ठाकूर (Anupsingh Thakur). आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपण त्याचे काम पाहिले असून, अनेक बॉडीबिल्डिंग स्पर्धांमधून देखील त्याने आपले नाव कमवले आहे.


शशिकांत पवार प्रॉडक्शन प्रस्तुत अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘बेभान’ (Bebhan) या आगामी चित्रपटातून मिस्टर वर्ल्ड अनुपसिंग ठाकूर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.


‘बेभान’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट


मधुकर (अण्णा) उद्धव देशपांडे आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’ असे उत्तम चित्रपट केल्यानंतर ‘बेभान’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे आपल्यासाठी घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. अनुप जगदाळे दिग्दर्शित आगामी ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा सुद्धा मनोरंजन क्षेत्रात कमालीची आहे. ‘रावरंभा’ या चित्रपटाची निर्मिती शशिकांत शीला भाऊसाहेब पवार करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी ‘रावरंभा’चं लेखन केलं आहे.


‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट


‘बेभान’ चित्रपटाची कथा दिनेश देशपांडे यांची असून, पटकथा नितीन सुपेकर यांची आहे. चित्रपटाचे छायांकन कृष्णा सोरेन यांचे असून संकलक म्हणून विजय कोचीकर यांनी काम पाहिले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचे संगीत लाभले आहे. अनुपसिंग ठाकूर यांच्यासोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरून जरी हा चित्रपट रोमॅंटिक असेल, असा अंदाज बांधता येत असला तरी अभिनेता अनुपसिंग ठाकूर असल्याने चित्रपटात अ‍ॅक्शन देखील पहायला मिळेल का?, यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. येत्या 11 नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 27 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!


Namrata Sambherao : 'चाळीमध्येच राहत होते, लालबाग-काळाचौकी माझं माहेर'; नम्रता संभेरावनं उलगडला आठवणींचा खजिना!