Shinzo Abe State Funeral : जपानचे (Japan) माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर आज शासकीय अंत्यसंस्कार (State Funeral) पार पडणार आहेत. भर सभेत शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज शिंजो आबे यांच्या शासकीय अंतसंस्कार पार पडणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जपानची राजधानी टोकियो येथे दाखल झाले आहेत. बुडोकन येथे शिंजो आबे यांच्यावर शासकीय अंत्यसंस्कार पार पाडणार आहेत. भारतीय वेळेनुसार, सकाळी 10.30 वाजता अंत्यसंस्काराला सुरुवात होईल. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित असतील.


शिंजो आबे यांचा मृत्यू कसा झाला?


शिंजो आबे यांनी 8 जुलै 2022 रोजी अखेरचा श्वास घेतला. शिंजो आबे यांच्या पार्थिवावर 15 जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज शिंजो आबे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. जपानमधील स्थानिक वेळेनुसार 8 जुलै 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता त्यांच्यावर गोळीबार झाला. नारा शहरात त्यांच्यावर हा हल्ला झाला. ते जपानमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी प्रचार करत होते.


शिंजो आबे यांचा परिचय


शिंजो आबे जपानचा जन्म 21 सप्टेंबर 1954 रोजी टोकियो येथे झाला. ते जपानच्या प्रभावशाली शासकीय घराण्यातील आहेत. त्यांचे आजोबा कैना आबे आणि वडील सिंतारो आबे हे जपानचे खूप लोकप्रिय नेते होते. त्याच वेळी त्यांचे आजोबा नोबोसुके किशी जपानचे पंतप्रधान होते. निओसाका येथून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सायकी विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी पूर्ण केली. त्यानंतर शिंजो आबे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला गेले. जिथे त्यांनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.


शिंजो आबे जपानचे पहिले तरुण पंतप्रधान


शिंजो आबे यांच्या वडिलांचे 1993 मध्ये निधन झाले, त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. निवडणुकीत त्यांना सर्वाधिक मते मिळाली. यानंतर शिंजो आबे यांची लोकप्रियता वाढतच गेली. 2006 मध्ये, लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते शिंजो आबे यांची वयाच्या 52 व्या वर्षी जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. याशिवाय शिंजो आबे हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या