मुंबई : इंडस्ट्रीत यायला प्रत्येकजण उत्सुक असतो. या झगमगत्या दुनियेत यायचं तर नशिब लागतं. कारण, संधी कमी आणि त्याला असणारे पर्याय जास्त असतात. म्हणूनच मागणीपेक्षा पुरवठा वाढला की मालाची किंमत कमी होते हा अर्थशास्त्राचा नियम. आता तो मनोरंजनसृष्टीलाही लागू होतो आहे. छोट्या छोट्या गावांमध्ये मनोरंजनसृष्टीत लोकांना यायची असलेली क्रेझ लक्षात घेऊन त्यांना फसवणाऱ्या अनेक टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. असाच अनुभव सांगली भागातल्या काही होतकरू स्थानिक कलाकारांना आला आहे. ही बाब अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी उघडकीला आणली आहे. 


चिन्मयी सुमित यांनी फेसबुकवर हा अनुभव कथन करतानाच होतकरू कलाकारांनी वेळीच सावध होण्याचा सल्लाही दिला आहे. वागळे की दुनिया या लोकप्रिय मालिकेचं नाव वापरून ही फसवेगिरी चालू असून डॅनी जोसेफ आणि प्रिसीला मॅम यांच्या नावाने हे मेसेज कलाकारांना येतात. आपण वागळे की दुनिया या मालिकेत दिसणार असून, त्याबदल्यात त्यांना मिळणारे पैसे सांगितले जातात. त्या बदल्यात कास्टिंग करणाऱ्या लोकांना किती पैसे मिळतील हे सगळं सांगितलं जातं. इतकंच नाही तर या कास्टिंगमध्ये येण्याआधी त्या मुलांकडून पैसेही उकळले जातात. अभिनेत्री चिन्मयी सुमितने ही बाब समोर आणली आहे. एबीपी माझाशी बोलताना चिन्मयी म्हणाल्या, छोट्या छोट्या गावातून अनेक मुलं मुंबईत येण्यासाठी धडपडत असतात. त्यांना बरोबर हेरून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. हे होऊ नये म्हणून मी फेसबुक पोस्ट टाकली.


सध्या सांगली आणि त्या भागातल्या तरुण तरुणींना या कास्टिंग एजन्सीद्वारे फसवण्याचं प्रमाण जास्त आहे. सांगली आणि त्या परिसरात मालिकांचे चित्रिकरण चालू असते. त्या मुलांना साधारण चित्रिकरण काय असतं हे माहित असतं. इतकंच नव्हे, छोट्या छोट्या भूमिकात दिसल्यानंतर या मुलांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे मुंबईत नशीब आजमावण्याकडे त्यांचा कल असतो. अशा मुलांना हेरून ही मंडळी त्यांना फोन करतात. वास्तविक वागळे की दुनिया या मालिकेचं कास्टिंग अशा पद्धतीने होत नाही. याबद्दल बोलताना अनेक मराठी-हिंदी सिनेमांचं कास्टिंग केलेला रोहन मापुस्कर म्हणाला, कुणाचाही फोन आला की आपण लगेच त्यावर विश्वास ठेवतो ते चूक आहे. आधी फोन आल्यानंतर आपण हा माणूस कोण आहे, तो काय करतो. त्याचं प्रोफाईल काय आहे. त्यानं काय काम केलं आहे हे सगळं पाहिलं पाहिजे. त्यानंतर त्यात आपण पुढे जायचं की नाही हे पाहाता येतं. 


चिन्मयी सुमित यांच्या पोस्टमुळे मनोरंजनविश्वात होणारी फसवणूक पुन्हा एकदा समोर आली आहे. अनेक तरुण तरुणींनी या फसवणुकीपासून सावध व्हायची गरज आहे.