मुंबई : लेखक, अभिनेते योगेश सोमण आणि नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्यात वाद रंगल्याची चिन्हं आहेत. योगेश सोमण यांनी खरमरीत पत्र लिहून आनंद, खेद, दुःख, संताप व्यक्त केला आहे.


मोहन जोशी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या निमित्ताने सोमण यांनी तिरकस पत्र लिहिलं आहे. 15 वर्षांची अध्यक्षीय कारकीर्द असताना आपला उमेदवारी अर्ज बाद कसा झाला, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. साधा उमेदवारी अर्ज भरता येत नसेल, तर असाच भोंगळ कारभार परिषदेत केला जात होता का? असा सवालही योगेश सोमण यांनी उपस्थित केला आहे.

प्रसाद कांबळी यांचा मार्ग मोकळा झाला, अशा एकांगी बातम्या काही माध्यमं देत असल्याचं सांगताना कालपासून तुम्ही तर 'मीडिया में छा गये बॉस' असा टोमणाही सोमणांनी मारला आहे. मोहन जोशी यांच्या अध्यक्षपदावरुन गेली काही वर्ष वाद रंगला आहे.

अभिनेते योगेश सोमण जवळपास 30 वर्ष कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अजय देवगन-तब्बू यांच्यासोबत 'दृश्यम' या गाजलेल्या हिंदी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याशिवाय दिल्या घरी तू सुखी राहा, नांदा सौख्यभरे, अंजली यासारख्या मराठी मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे.

'इफ्फी'मधून रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' चित्रपटाला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर इतर मराठी सिनेमांनी महोत्सवातून माघार घेण्याचं ठरवलं होतं. मात्र योगेश यांचं दिग्दर्शन आणि निर्मिती असलेला ‘माझं भिरभिर’ हा सिनेमा इफ्फीत दाखवण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.

काय आहे पत्र?

प्रति,
श्री मोहन जोशी
मा. अध्यक्ष, नाट्यपरिषद.

विषय - आनंद, खेद, दुःख, संताप सारेच व्यक्त करणे.

महोदय,

आज वर्तमानपत्रातून तुमचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या बातम्या वाचल्या ( म्हणजे कालपासून मीडिया में छा गये बॉस ) आणि माझी मलाच गंमत वाटली, म्हणजे काही दिवसांपूर्वी आपल्याला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला किंवा विष्णुदास भावे पुरस्कार मिळाला, या ही बातम्या वाचल्या तेव्हा आनंद झाला तो व्यक्तही केला. आता कसं व्यक्त होऊ? 15 वर्षांची आपली अध्यक्षीय कारकीर्द, एकसे एक हुशार माणसं आपल्या भोवती, साधा उमेदवारी अर्ज आपल्याला भरता येऊ नये? तुमच्या सकट सगळे सेम चूक करतात? मोहनराव मग आता शंका मनात येऊ लागते की असाच भोंगळ कारभार परिषदेत केला जात होता का? असो कालपासून आपण अस्वस्थ असाल, आपल्या दुःखावर डागण्या द्यायची माझी अजिबात इच्छा नाही.

मोहनराव आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. अभिनेते म्हणून आपण आदरणीय आहातच. आता वेळ मिळाल्यास आपण माझ्या प्रशिक्षणाच्या विविध उपक्रमात सहभागी व्हावेत ही विनंती. एक महत्वाची गोष्ट, याही वेळी चुकीच्या माहितीवर बातम्या देण्याची प्रथा काही माध्यमांनी चालू ठेवलीच आहे - बाद झालाय तो उमेदवारी अर्ज अध्यक्षपदाचा अर्ज नव्हे आणि फक्त मुंबई पुरती ही निवडणूक नाही महाराष्ट्रभरातून जवळ जवळ 40 उमेदवार निवडून येणार आहेत, ते ठरवणार आहेत अध्यक्ष कोण होणार ते. थोडक्यात प्रसाद कांबळी यांचा मार्ग मोकळा झाला वगैरे एकांगीबातम्या देऊ नयेत.

धन्यवाद

आपला,

योगेश सोमण