मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून विद्यमान अध्यक्ष आणि अभिनेते मोहन जोशी यांचाच अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे 2018 ते 2023 सालासाठी होणाऱ्या निवडणुकीमधून जोशी बाहेर पडले आहेत.
आज जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या अंतिम यादीमध्ये मोहन जोशी यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे नाट्य क्षेत्रात मोठी चर्चा सुरु आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नवी कार्यकारिणी निवडण्यासाठी येत्या 4 मार्च रोजी निवडणूक होत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवाराच्या अर्जावर सुचक आणि अनुमोदक अशा दोघांच्या सहीची आवश्यक्ता असते.
मोहन जोशींच्या अर्जावर अभिनेते अशोक शिंदे यांनी सही केली आहे. पण शिंदे यांचं नावच मतदार यादीत नाही. त्यामुळे त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या अर्जावर सुचक किंवा अनुमोदक म्हणून सही केली आहे, त्या सर्वांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यात प्रामुख्याने मोहन जोशी, तुषार दळवी, अशोक शिंदे आणि सुनील तावडे यांच्या नावांचा समावेश आहे.
वास्तविक, मोहन जोशी 2003 पासून नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत. यात मधल्या तीन वर्षांचा अपवादही आहे. पण मतदार यादीत नाव नसलेल्या व्यक्तीकडून सुचक अथवा अनुमोदक म्हणून सही करुन घेतल्यामुळे, त्याच्या फटका मोहन जोशी पॅनेलला बसला आहे.
दरम्यान, या निवडणुकीत 19 जिल्ह्यांसाठी 60 नियामक सदस्य जागा असून, यात 122 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे. 25 जानेवारीपर्यंत ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, त्यानंतरच निवडणूक रिंगणात एकूण किती उमेदवार असतील हे स्पष्ट होईल.
नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून मोहन जोशींचा अर्ज बाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2018 10:19 PM (IST)
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून विद्यमान अध्यक्ष आणि अभिनेते मोहन जोशी यांचाच अर्ज बाद झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -