कोल्हापूर: ‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेच्या शूटिंगला कोल्हापूरजवळच्या वसगडे या गावातील नागरिकांनी विरोध केला आहे.

अटींचा भंग केल्याने वसगडे ग्रामपंचायतीने शूटिंग बंद करण्याची नोटीस प्रॉडक्शन हाऊसला दिली आहे. यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील 150 हून अधिक कलाकार,सहकलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या रोजी- रोटीचा प्रश्न निर्माण झालं आहे. तर प्रॉडक्शन हाऊस आणि ग्रामस्थ यांच्यात तोडगा निघावा म्हणून चित्रपट महामंडळाने पुढकार घेतला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या  मालिकेचं  शूटिंग गेल्या दीड वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यतल्या वसगडे गावात सुरु आहे. या मालिकेतील राणादा आणि  पाठक बाई यांची जोडी खूपच लोकप्रिया आहे.

या जोडीला महाराष्ट्राने अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे त्यांचे फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. नेमका त्याचाच त्रास गावकऱ्यांना होत आहे.

“शूटिंग मुळे गावाची सामाजिक शांती भंग होत आहे. शिवाय क्रू मेंबर, कलाकार आणि संबंधित व्यक्ती गावात दारु पिऊन, मटण खाऊन चौकात घाण करतात. इतकंच नाही तर शूटिंग रात्रभर सुरु असतं, त्यामुळे जनरेटरच्या आवाजाने झोप लागत नाही. शिवाय मुलांच्या अभ्यासावरदेखील परिणाम होत आहे. तसंच शूटिंग पाहायला येणाऱ्या व्यक्तींच्या पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे”, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे.

शूटिंग सुरु होण्यापूर्वी ग्रामपंच्यातीने दिलेल्या परवानगीत अनेक नियम अटी घातल्या आहेत. पण या अटींचा भंग केल्याचा आरोप करत, ग्रामस्थांनी थेट ग्राम पंचायतीवर मोर्चा काढला.

यावेळी महिलांनी केलेल्या मागणीवरुन, वसगडे ग्रामपंचायतीने तात्काळ प्रोडक्शन हाऊसला नोटीस पाठवून शूटिंग थांबवण्याचे आदेश दिले.

ग्रामपंचायतीच्या शूटिंग बंदीच्या नोटीसनंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पुढाकार घेत सरपंचांची भेट घेतली. मालिकेला शूटिंग सुरु करण्याची परवागनी द्यावी अशी मागणी चित्रपट महामंडळाने ग्रामपंचायतीकडं केली. तसंच कोल्हापूर आणि परिसरातील दीडशेहून अधिक कलाकार, तंत्रज्ञांच्या रोजीरोटीचा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून गावात शूटिंग सुरु असताना, आताच विरोध का झाला? गावातील राजकीय वादातून हा विरोध होत आहे का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

संबंधित बातम्या

'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी 

पॅकअप झाल्यावर ‘ती’ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही! 

फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय! 

इंटरनेटवरील पाठकबाईंबद्दलची ही माहिती चुकीची! 

फोटो : राणा दा आणि पाठक बाईंच्या लग्नाचा अल्बम