छोट्या अमृतचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. अमृत मूळचा नाशिकजवळच्या घोटी गावातला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड आहे. फावल्या वेळात गाणी ऐकणं हा त्याचा छंद. मालिकेसाठी जेव्हा ऑडिशन सुरु होती, तेव्हा अमृतला त्याबद्दल समजलं आणि त्याने थेट ऑडिशनचं ठिकाण गाठलं.
अमृतचा उत्साह आणि हजरजबाबीपणा भाव खाऊन गेला आणि अमृतची छोट्या आंबेडकरांच्या रोलसाठी निवड झाली. अमृत सेटवर सर्वांचाच लाडका आहे. दिग्दर्शक अजय मयेकरांच्या सूचनांचं तो काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळेच सीन अधिकाधिक खुलून येतात.
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू
मालिकेत अमृतच्या मोठ्या भावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आनंदासोबत त्याचं नातं अधिक घट्ट आहे. आनंदाशिवाय एक क्षणही तो राहत नाही. हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचं शीर्षकगीतही अमृतने तोंडपाठ केलं आहे. सेटवर सतत तो हे शीर्षकगीत गुणगुणत असतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. अभिनयाचं वेड असलेल्या अमृतला याच क्षेत्रात करिअर करायचं आहे.
अभिनेता सागर देशमुख ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या भूमिकेत दिसणार असून रमाबाई आंबेडकरांची व्यक्तिरेखा अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारणार आहे.