मुंबई : चुरशीचे गेम, तुफान राडा, स्पर्धकांमधली ठसन यामुळे गाजलेल्या 'बिग बॉस मराठी'चा दुसरा सिझन दिमाखात सुरु झाला आहे. सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी 15 स्पर्धकांना 'बिग बॉस'च्या घरात कुलूपबंद केलं आहे. सुरेखा पुणेकर, अभिजीत बिचुकले या संभाव्य नावांसोबत किशोरी शहाणे-वीज, मैथिली जावकर, वैशाली माडे, अभिजीत केळकर यासारखे तगडे कलाकार यंदा बिग बॉसच्या पर्वात दिसणार आहेत.


नव्वदच्या दशकात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यासारख्या सुपरस्टार्ससोबत मराठी पडदा गाजवणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात सहभागी होणाऱ्या पहिल्या स्पर्धक होत्या. किशोरी शहाणेंनी अनेक मराठी-हिंदी मालिका,नाटक, चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. किशोरी शहाणे या फिटनेसप्रेमी म्हणून ओळखल्या जातात.

महाराष्ट्राची महागायिका म्हणून लोकप्रिय असलेली, बॉलिवूडमध्येही आपला आवाज पोहचवलेली पार्श्वगायिका वैशाली माडेही या पर्वात झळकणार आहे. वैशालीने शेतकरी कन्या ते महागायिकेपर्यंतचा प्रवासच ग्रँड प्रिमिअरमध्ये उलगडला.

'वस्त्रहरण' नाटकात तात्या सरपंच साकारणारा 'कोकणचा आपला माणूस' अर्थात विनोदी अभिनेते दिगंबर नाईक आणि 'सेक्रेड गेम्स' मधली मिसेस काटेकर म्हणजेच नेहा शितोळे यांनी बिग बॉसच्या घरात जोडीने एन्ट्री घेतली. दिगंबर नाईक यांनी नारायण राणे यांचा आवाज काढत आपल्या डोक्यावर 'दादां'चा हात असल्याचं सांगितलं.

अभिनेत्री मैथिली जावकरनेही बिग बॉसच्या घरामध्ये आपली हजेरी लावली आहे. छोटा-मोठा पडदा गाजवलेली ही नृत्यांगना काही काळापूर्वी एका वेगळ्याच कारणाने चर्चेतही होती.

VIDEO | 'भाई'वरील टीकेवर महेश मांजरेकर यांचं बिनधास्त उत्तर | ढॅण्टॅढॅण 



कवीमनाचा राजकीय नेता म्हणून ज्याच्या नावाची चर्चा होती त्या अभिजीत बिचुकलेनेही बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळवला आहे. बिचुकलेने 2004 पासून प्रत्येक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता, अगदी राष्ट्रपतीपदासाठीही त्याने इच्छुक असल्याचं पत्र लिहिलं होतं. साताऱ्याच्या हा नेता विविध कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतो. अगदी उदयनराजे भोसलेही बिचकुलेला बिचकून असतात. यंदाच्या निवडणुकीत पराभव पत्करलेला हा नेता बिग बॉसचं विजेतेपद पटकावणार का, याची उत्सुकता आहे. अभिजीतचा वावर हा अनिल थत्तेंची आठवण करुन देणारा आहे.

'बिग बॉस'च्या पहिल्या प्रोमोमुळे चर्चा रंगली लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची. लावणीचे फड गाजवल्यानंतर ही लावण्यवती आता बिग बॉसचा फड गाजवायला सज्ज झाली आहे. सुरेखा पुणेकरांनी एन्ट्रीलाच आपण इंगा दाखवणार असल्याचे संकेत दिले.

'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री वीणा जगताप, 'रोडीज'मध्ये सहभागी झालेला अमरावतीचा पोट्ट्या शिव ठाकरे, सेलिब्रेटी शेफ पराग कान्हेरे यासारखे चेहरेही बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. देवयानी मालिकेमुळे घराघरात पोहचलेली 'बोल्ड अँड ब्यूटीफूल' शिवानी सुर्वेही मराठीत परतली आहे. विशेष म्हणजे शिवानी ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनची विजेती मेघा धाडेची मैत्रीण आहे.

याशिवाय 'बाप्पा' या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले हरहुन्नरी अभिनेते विद्याधर जोशी बिग बॉसमध्ये सहभागी झाले आहेत. मालिकांतून लोकप्रिय झालेला अभिनेता माधव देवचक्के आणि अभिनेत्री रुपाली भोसले यांनीही जोडीनेच एन्ट्री घेतली, तेव्हा महेश मांजरेकरांनी त्यांची तुलना 'सई-पुष्कर'सोबत केली. तारुण्य टिकवून असलेला अभिनेता अभिजीत केळकर हा बिग बॉसच्या घरात सहभागी झालेला अखेरचा स्पर्धक होता.

मुंबईतील गोरेगावमधील फिल्म सिटीमध्ये 'बिग बॉस मराठी'चा सेट उभारण्यात आला आहे. पुढचे शंभर दिवस बिग बॉसच्या घरात काय राडे होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.