मुंबई : #amarphotostudio हा हॅशटॅग सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर चांगलाच लोकप्रिय झाला आहे. सामान्य यूझर्सपासून मराठीतले सुप्रसिद्ध कलाकारही आपले लहानपणीचे किंवा नजीकच्या काळातले पासपोर्ट साईझ फोटो शेअर करताना दिसत आहेत.
अनेक जण मजा म्हणून हे फोटो अपलोड करत असतानाच हा ट्रेण्ड सुरु झाला. आपला फोटो शेअर करुन आपल्या मित्रमैत्रीणींना टॅग करुन चॅलेंज पुढे सुरु ठेवायचं, अशी ही पद्धत. मात्र #amarphotostudio या हॅशटॅगने शेअर करण्यामागचं कारण कित्येकांना माहितच नाही.
अल्पावधीतच तरुणाईची मनं जिंकणाऱ्या 'दिल दोस्ती दुनियादारी'चे लोकप्रिय कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र टीव्ही मालिका नाही, तर 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकाच्या माध्यमातून. 'सुबक' निर्मित, 'कलाकारखाना' प्रस्तुत 'अमर फोटो स्टुडिओ' ही नव्या नाट्यकृती लवकरच रंगमंचावर येत आहे.
अमेय, सुव्रत, सखी या तिघांनी मिळून आणलेल्या कलाकारखाना या संस्थेतर्फे सध्या फेसबुक यासारख्या सोशल नेट्वर्किंग साइटवर अमर फोटो स्टुडीओ ही अॅक्टिव्हीटी जोशात सुरु आहे. अभिनेता सुनील बर्वे यांनी चार वर्षांपूर्वी‘हर्बेरिअम’ हा आगळावेगळा उपक्रम सुरु केला.
अभिनेता सुनील बर्वे यांच्या ‘सुबक’ची निर्मिती असलेल्या या उपक्रमाला नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. यात ‘सुर्याची पिल्ले’, झोपी गेलेला जागा झाला’, ‘हमीदाबाईची कोठी’,‘लहानपण देगा देवा’ आणि ‘आंधळं दळतंय’ या पाच जुन्या गाजलेल्या नाटकांचे नव्या संचात सादरीकरण करुन नाटय रसिकांना एक अनोखी मेजवानी दिली.
आता ‘सुबक’ची अमर फोटो स्टुडिओ ही नवीकोरी कलाकृती घेऊन सुनील बर्वे पु्न्हा येत आहेत. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे, सिद्धेश पूरकर ही लोकप्रिय कलाकार मंडळी यात एकत्र आली आहेत. मनस्विनी लता रवींद्र यांचे लेखन असणाऱ्या या नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी करीत आहेत.
नाटकाचं नावच उत्सुकता वाढवणारं असून त्याचा विषय अजून गुलदस्त्यात आहे. मात्र रसिक प्रेक्षकांसाठी ती एक अफलातून ट्रीट असल्याचं म्हटलं जात आहे. चेतन डांगे लिखित यातील गीतांना गंधार संगोराम यांचे पार्श्वसंगीत असणार आहे. या नाटकाची संकल्पना घेऊन अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले हे कलाकार सुनील बर्वे यांच्या कडे गेले त्यांनाही हा विषय आवडला आणि तरुणाईला प्रोत्साहन द्यावं या हेतूने सुनील बर्वे यांनी या कलाकृतीला पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे.