पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं आहे. पुण्यात वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लालन सारंग यांच्या जाण्यानं सिनेसृष्टी आणि मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.


लालन सारंग या 1968 पासून नाट्यक्षेत्रात काम करत होत्या. अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. त्यांनी केलेल्या 'सखाराम बाइंडर' नाटकातील चंपा, 'सहज जिंकी मना' नाटकातील मुक्ता, 'आक्रोश' नाटकाली वनिता, 'आरोप' नाटकातील मोहिनी इत्यादी भूमिका प्रचंड गाजल्या.


2006 मध्ये कणकवली येथे पार पडलेल्या 87 व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.


लालन सारंग यांचा ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या 'गृहिणी सखी सचिव' या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता. याशिवाय पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे दिला जाणारा कलागौरव पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.