बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडलेल्या गायिका वैशाली म्हाडेने "आता मी या घरातून बाहेर जरी आले असले तरी मी त्याला कधीच माफ करणार नाही", अशा शब्दात आपला संताप दर्शवला आहे.  वैशालीच्या बोलण्याचा रोख थेट पराग कान्हेरेकडे होता हे बिग बॉस फॉलो करणाऱ्यांना वेगळं सांगायला नको. "बिग बॉसने मला खूप चांगले अनुभव दिले. अनेक कलाकारांशी मला स्वत:ला जोडता आलं. बिग बॉस तुम्हाला फक्त दीड तास दिसत होतं. पण त्या पलिकडे जवळपास २२ तास आम्ही एकत्र होतो. त्यातून अनेक चांगले अनुभव मला मिळाले. उरला प्रश्न त्या एका घटनेचा. तर त्यामुळे मात्र मला खूपच मनस्ताप सहन करावा लागला", असंही ती म्हणाली.

यंदाच्या सीझनमध्ये वैशालीला खात्री वाटते ती शिव आणि अभिजीतबद्दल. त्या दोघांपेकी कुणीतरी एक जण बिग बॉसचा विजेता होईल असं तिला वाटतं. तिला जर दोन स्पर्धकांना बाद करण्याचा अधिकार दिला तर तू ते कुणाला करशील, असं विचारताच तिने विचार करून नेहा शितोळे आणि रूपाली भोसले यांची नावं घेतली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ती तिच्या मुलीला भेटलीच. पण सगळ्यात मोठी गंमत झाली ती सकाळी उठताना. ती म्हणाली, "सलग दोन महिने मी सकाळी गाण्याच्या तालावर उठे. हात वर करून ती उठायची आमची एक पद्धत आहे. त्याची सवय झाली. घरी आल्यावर मला वाटलं की कुठेतरी गाणं चालू आहे. मग घरातही मी तडक हात वर केला आणि क्षणभर मला कळेचना की काय चालू आहे. नंतर लक्षात आलं की आपण आता घरी आलो आहे".

मुलीच्या आठवणीने व्याकूळ झालेली वैशालीही इथे पाहायला मिळाली. ती म्हणाली, "गेल्या आठवड्यात माझ्या मुलीचा वाढदिवस होता. त्यावेळी मला तिची फार आठवण आली. कारण दर वाढदिवशी ती आजारी पडते. त्या दिवशी मी खूप एकटी होते. अभिजीत, वीणा आदींनी मला धीर दिला. पण त्या दिवशीपासून मला वाटू लागलं की आता पुरे.. आता आपण या घरातून बाहेर यायला हवं. आता मी बाहेर आले याचा मला नक्कीच आनंद होतो आहे".

परागवर कायदेशीर कारवाई?

बिग बॉसच्या घरात असताना सिंहासनाच्या टास्कवेळी पराग कान्हेरे आणि वेशाली, नेहा यांच्यात मोठी झटापट झाली होती. त्यावेळी परागने संयम सोडत नेहाला मारहाण केली. त्याबद्दल त्याला घरातून बाहेर जावं लागलं. त्यानंतर त्याा घरात येण्याची संधी देण्यात आली होती. पण अपवाद वगळता सर्वच स्पर्धकांनी त्याला नकार दिला. त्यावेळी वैशालीने मात्र याला बाहेर आल्यावर याच्यावर आपण कायदेशीर कारवाई करू असं सांगितलं होतं. त्याबद्दल बोलताना कुणाचंही नाव न घेता वैशाली म्हणाली, "मी त्याला कधीच माफ करणार नाही. माझ्या मनात त्याच्याबद्दल आजही तेवढाच संताप आहे". असं असेल तर तू आता बाहेर आल्यानंतर परागवर कायदेशीर कारवाई करणार का यावर मात्र तिने काही वेळ घेतला. याबाबत कोणत्याही निष्कर्षावर आपण आलो नसल्याचं तिने 'एबीपी माझा'ला सांगितंल.