मुंबई : द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात कपिल सोबतच त्याच्या ऑनस्क्रीन कुटुंबीयांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. लग्नासाठी आसुसलेल्या पिंकी बुआ अर्थात उपासना सिंगचं वैवाहिक आयुष्य प्रत्यक्ष जीवनातही काहीसं सुरळीत नसल्याचं वृत्त आहे. उपासना सिंग पतीपासून लवकरच विभक्त होणार आहे.


उपासना आणि त्यांचे पती नीरज भारद्वाज गेल्या 4 वर्षांपासून वेगळे राहत आहेत. मात्र अखेर त्यांनी कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नीरज येत्या दिवाळीत घटस्फोटासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहेत. पुन्हा एकत्र येण्यासाठी उपासना आणि नीरज यांनी प्रयत्न केले, मात्र ते फोल ठरल्याने गेल्या 9 महिन्यांपासून ते एकमेकांशी बोलत नाहीत.

'ती व्यावसायिक आघाडीवर माझ्याहून जास्त प्रसिद्ध आहे. मात्र हा मुद्दा आमच्या नात्यात कधीच नव्हता. मी तिच्या अपेक्षांमध्ये बसत नाही, तिला माझी गरज नाही, मी तिला मोकळीक द्यायला हवी. आम्ही एकमेकांसाठी बनलेलो नाहीत' असं नीरज यांनी सांगितलं.

उपासना सिंग यांनी मात्र या विषयावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. माझं वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणण्याची इच्छा नाही, असं उपासना यांनी म्हटलं आहे. उपासना आणि नीरज 2009 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. नीरज यांनी 'साथ निभाना साथिया' मालिकेत साकारलेली 'चिराग मोदी' ही व्यक्तिरेखा गाजली होती.

नीरज यांनी अनेक मालिका आणि भोजपुरी चित्रपटात हिरो तसंच खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'ऐ दिल-ए-नादान' या मालिकेच्या सेटवर त्यांची ओळख झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.