मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून नाईकांच्या वाड्यातील रहस्यमयी हालचाली आता शांत होणार आहेत. दिवसेंदिवस उत्कंठा वाढवणाऱ्या या वाड्यात घडणाऱ्या घटनांमागचा खरा गुन्हेगार कोण? याचे उत्तर घरातील मंडळी आपापसातच शोधत आहेत. पण त्यांना आणि प्रेक्षकांना हवे असलेले उत्तर दिवाळीपूर्वीच मिळणार आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका दिवाळीपूर्वीच निरोप घेणार आहे. त्याजागी आदिनाथ कोठारे आणि तेजस्विनी पंडित या जोडीची ‘हंड्रेड डेज’ ही रहस्यमय मालिका दाखल होणार आहे.
मालवणी भाषेचा लेहजा असलेल्या या मालिकेत एकामागोमाग एक घडत जाणाऱ्या रहस्यमय घटनांचा माग घेताना, कोकणातील सगळ्या प्रथा, अंधश्रद्धा यांचा आधार घेत रचलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला सुरुवातीला विरोध झाला होता. या विरोधाला छेद देत या मालिकेने दोनशे भागांचा टप्पा गाठला. कुठलेही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा आज घराघरांत लोकप्रिय झाल्या आहेत.