नवी दिल्ली : गेल्या दशकाच्या सुरुवातीला टेलिव्हिजन जगतात स्टार प्लसवरील 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेचा दबदबा होता. त्या काळात महिला वर्गाची ही मालिका सर्वात आवडती होती. या मालिकेला बंद होऊन आता अनेक वर्षे झाली आहेत, पण एका ट्विटमुळे ही मालिका पुन्हा चर्चेत आली आहे.


एका पंजाबी तरुणाने या मालिकेच्या शीर्षक गीतावरील पंजाबी भांगडा नृत्यचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या ट्वीटमुळे सोशल मीडियात याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या तरुणाने हा व्हिडीओ विद्यमान केंद्रीय मंत्री आणि मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणी आणि मालिकेच्या निर्मात्या एकता कपूर यांनाही टॅग केला आहे.


विजय अरोरा असं या तरुणाचं नाव असून, या तरुणाने व्हिडीओ पोस्ट करताना म्हणलंय की, 'पंजाबी कोणत्याही गाण्यावर नृत्य करु शकतात.'



विजयच्या ट्वीटला स्मृती इराणी यांनीही तत्काळ प्रतिसाद दिला आहे. इराणी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणलंय की, 'एकदम बरोबर आहे... पाजी पाओ भांगडा'


दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका विमान प्रवासादरम्यान स्मृती इराणी आणि रॉनित रॉय यांची भेट झाली. रॉनितने या भेटीचा फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला होता. रॉनितने या मालिकेत मिहिर ही व्यक्तीरेखा साकारली होती.