मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेता समीर शर्मा मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. 44 वर्षीय समीर शर्माने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
समीर सर्माने ज्योती, कहानी घर घर की, लेफ्ट राईट लेफ्ट, इस प्यार को क्या नाम दूं - एक बार फिर, ये रिश्ते है प्यार के या मालिकांमध्ये काम केलं आहे. अनेक मालिकांत त्याने भाऊ, वडील, नायिकेचा भाऊ अशा व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. मालाडमधील राहत्या घरी किचनमध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.
नाईट ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने बुधवारी (5 ऑगस्ट) रात्री त्याचा मृतदेह पाहिला आणि रहिवाशांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. समीर शर्माने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसंच सध्या राहत असलेलं घर त्याने फेब्रुवारी महिन्यात भाड्याने घेतलं होतं, असंही पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान समीर शर्माच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. शिवाय घरात कोणतीही सुसाईड नोटही सापडलेली नाही.
काही महिन्यांपूर्वी तो आजारी होता. परंतु आजारपणातून बरा होऊन त्याने मालिकेत पुनरागमनही केलं होतं. सध्या तो स्टार प्लसवरील ये रिश्ते है प्यार के या मालिकेत काम करत होत. या मालिकेत ते कुहूच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारत होता.
पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे, अशी माहिती मालाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉर्ज फर्नांडिस यांनी दिली.
MAHA Govt VS Bihar Govt | सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार सरकार | स्पेशल रिपोर्ट