मुंबई : मुंबईत एका टीव्ही अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला ज्योतिषाच्या तक्रारीनंतर अभिनेत्यावर मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली असून तपास सुरु आहे. लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. शिवाय आरोपीने बलात्काराचा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केलं आणि पैसे उकळले, असा दावाही महिलेने केला आहे.


पोलिस स्टेशनमधील नोंद गुन्ह्यानुसार, ऑक्टोबर 2016 मध्ये एका डेटिंग अॅप्लिकेशनद्वारे दोघांची भेट झाली. यानंतर दोघे चांगले मित्र बनले. आरोपीने एका दिवशी महिलेला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावलं. यावेळी आरोपीने महिलेला लग्नाचं वचन दिलं.

महिलेच्या आरोपानुसार, आरोपीने तिला नारळ पाणी प्यायला दिलं. ते प्यायल्यानंतर काही वेळाने तिला चक्कर आली. यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि मोबाईलवर त्याचा व्हिडीओही बनवला.

लग्नासाठी दबाव टाकल्याने धमकी
"या व्हिडीओद्वारे तो आपल्याला ब्लॅकमेल करुन पैसे उकळत होता. तरीही मी त्याला लग्नाबाबत विचारणा करत होते. पण तो दरवेळी दुर्लक्ष करायचा आणि पैशांची मागणी करायचा. काही दिवसांपूर्वी मी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला, तेव्हा धमकी देत म्हणाला की, तुला जे करायचं ते कर," असा दावा महिलेने केला आहे.

आरोपीवर गुन्हा, तपास सुरु
यानंतर महिलेने अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "आम्ही महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. आरोपीविरोधात बलात्कार, बळजबरीने पैसे उकळणं यासह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे."