मुंबई : आज खुलेआम बेलगाम वक्तव्य केली जातात. भाजपचे काही नेतेही अनेकदा बेलगाम वक्तव्य करतात. अशा नेत्यांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिस्त आणि सभ्यता शिकण्याचा सल्ला दिला आहे. भाजपचे सध्याचे जे नेते आहेत. त्यांनी तोंडावर जरा लगाम घातला पाहिजे.  राजा एकटा चांगला असून उपयोग नाही. त्याच्या हाताखालच्या फळ्यांमधील लोकांनी जरा लगाम घालावा, असेही गोखले यावेळी म्हणाले. मोदींची जी शिस्त आहे, ती शिस्त भाजपात रुजली पाहिजे. तुम्ही वैचारिक गोष्टी बोला, असा सल्लाही विक्रम गोखले यांनी यावेळी दिला.



एबीपी माझाच्या कट्ट्यावर बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली. 'लोकशाहीची गळचेपी होत आहे असं म्हणणाऱ्यांच्या मुस्काटात मारली पाहिजे' असं म्हणणं हा माझा क्षणिक उद्वेग होता, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी मी असं जरी म्हटलं असं कुणीही करू नये, असेही त्यांनी सांगितले. पाकिस्तान जिंदाबाद असं म्हणणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी मी म्हटलं होतं, तो देखील माझा क्षणिक उद्वेग होता, असेही ते म्हणाले. माझ्या या विधानावर सोशल मीडियावर अश्लाघ्य भाषेत टीका झाल्या. मात्र लोकांना बोलायचे स्वातंत्र्य आहे. लोकशाही आहे.

अटलजींच्या वेळचा भाजप वेगळा आणि आताच वेगळा आहे, असेही गोखले यावेळी म्हणाले. सोबतच 'चौकीदार' वरून होणार राजकारण खालच्या पातळीवरच आहे. शेतकरी आणि जवानांचा वापर राजकारणासाठी करणे अत्यंत चुकीचं आहे, असेही ते म्हणाले.

राज ठाकरेंची भाषणं मनोरंजनासाठी ऐकावी आणि टाळ्या वाजवाव्या : विक्रम गोखले

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भाषणं ही केवळ मनोरंजनासाठी ऐकावी आणि टाळ्या वाजवाव्या, अशी प्रतिक्रिया विक्रम गोखले यांनी दिली.  राज ठाकरे यांच्या सभांविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरेंची भाषणं  केवळ मनोरंजनासाठी असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरेंचे व्हिडीओ किती खरे आणि किती खोटे आहेत, याबाबत कल्पना नाही. मात्र मनोरंजनासाठी राज ठाकरेंची भाषण बघावी आणि टाळ्या वाजवाव्यात. राज ठाकरे हे छोटे आहेत. त्यांनी दाखविलेले व्हिडीओ किती खरे किती खोटे आहेत हे तपासण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे, असे गोखले म्हणाले.

यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी बारामतीचा विकास केला. मात्र बारामतीसारखा विकास त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा करायला हवा होता. राष्ट्रवादीत एकमेव व्हिजनरी माणूस म्हणजे शरद पवार हे आहेत. मात्र त्यांनी महाराष्ट्राचा विकास का केला नाही? असा सवाल देखील गोखले यांनी केला. त्यांचे ईव्हीएमबद्दलचे विधान चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. या सरकारने नोटाबंदीचा निर्णय घ्यायला घाई केली. मी अर्थशास्त्रज्ञ नाही. मात्र अर्थशास्त्रज्ञांनी नोटाबंदी ही चुकीची असल्याचं सांगितलं आहे. ही नोटाबंदी नंतरही करता आली असती. नोटाबंदीमुळे काळा पैसा कुठेही थांबणार नाही. नोटाबंदीने काहीच साध्य झालं नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

बुलेट ट्रेन ही प्राथमिकता नाही. या देशातला सामान्य माणूस पाणी, आरोग्य, रस्ते अशा मूलभूत सोयींसाठी झगडत आहे, त्यावेळी अशा गोष्टींची गरज नाही, असेही गोखले यावेळी म्हणाले.

कुठेही हत्या होणे हे वाईटच आहे. मात्र अशा हत्या आधी कधीच झाल्या नाहीत का? विचारवंतांना कधीच अटक झाली नाही का? याचा अर्थ असा नाही की आता होतंय ते बरोबर होतं आहे, असेही गोखले यावेळी म्हणाले.

नयनतारा सहगल यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला हवं होतं. त्यांना त्यांची भावना मांडू न देणे ही सरकारची चूकच आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो, असेही ते म्हणाले.