मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेते आशिष रॉय यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यांना जुहूतील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आशिष रॉय यांच्या मेंदूत गाठ आल्याची माहिती आहे. 'बनेगी अपनी बात' मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केलेल्या रॉय यांनी अनेक चित्रपट-मालिकांमधून अभिनय केला आहे.

आशिष यांना चित्रिकरणाला नेण्यासाठी ड्रायव्हर आला. मात्र ते हालचाल करत नसल्यामुळे त्याने रॉय यांना जुहूतील क्रिटीकेअर रुग्णालयात नेलं. त्यानंतर आशिष यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच त्यांच्या मेंदूतील ब्लड क्लॉटवर शस्त्रक्रिया झाली होती.

आशिष यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं नसलं तरी पक्षाघातामुळे त्यांना शरीराची डावी बाजू हलवता येत नाहीये. पुढील रिपोर्ट्सनंतर डॉक्टर उपचारांची दिशा ठरवणार आहेत.

53 वर्षीय आशिष रॉय यांनी 1997 साली 'बनेगी अपनी बात' मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर दम दमा दम, मूव्हर्स अँड शेकर्स, यस बॉस, रिमिक्स, बा बहू और बेबी, ससुराल सिमर का, मेरे अंगने मे अशा अनेक मालिकांमधून त्यांनी काम केलं आहे.

सचिन खेडेकरांच्या 'नेताजी सुभाषचंद्र बोस' सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर होम डिलीव्हरी, एमपी3 अशा सिनेमांतही त्यांनी भूमिका केल्या आहेत.