Tuzi Mazi Yari Web Series : प्लॅनेट मराठी ओटीटीवर 7 ऑक्टोबरपासून "तुझी माझी यारी" ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. माणसाला जन्मत:च अनेक नाती लाभतात. ज्यांची आपण निवड करू शकत नाही. पण या सगळ्यात असे एक नाते आहे ज्याची निवड आपण स्वत: करतो. ते नाते म्हणजे मैत्रीचे. जगात एकही मित्र नसणारा माणूस सापडणे तसे दुर्मिळच. 
मैत्रीचे नाते प्रत्येकासाठी खास असते. अशाच मैत्रीच्या सुंदर नात्यावर भाष्य करणारी "तुझी माझी यारी" ही वेब सीरिज असणार आहे. 


काही दिवसांपूर्वीच या वेबसीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले होते. त्यात बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील अभिनेत्री मीरा जगन्नाथ आणि अभिनेत्री स्नेहल साळुंके दिसत होत्या. यावरुन ही वेबसीरिज त्यांच्या नि:स्वार्थी मैत्रीवर भाष्य करणारी आहे याचा अंदाज आला होता. या वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर प्रेक्षकांना त्या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद दिला होता. त्यात मीरा आणि स्नेहल या दोघींची झालेली ओळख ते मैत्री आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात येणारे अडथळे, त्यावर मात करत निभावलेली मैत्री असा मैत्रीचा सुरेख प्रवास "तुझी माझी यारी" मध्ये उलगडण्यात आला आहे. 


फिल्मी स्टुडिओजच्या अंकित शिंदे, दिव्या घाग, तेजस नागवेकर निर्मित "तुझी माझी यारी" या वेबसीरिजचे प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या वेब सीरिजचे दिग्दर्शन तुषार घाडीगावकार याने केले असून सुमेध किर्लोस्करने लेखन केले आहे. 


याआधी प्लॅनेट मराठीने 'जॉबलेस' या वेबसीरिजची निर्मिती केली होती. ही वेबसीरिज ''सद्यस्थितीवर आधारित होती. कोरोनामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हा ज्वलंत विषय 'प्लॅनेट मराठी ओटीटी' ने 'जॉबलेस' या वेबसीरिजमधून मांडण्याचा प्रयत्न केला होता. नोकरी गेल्याने अनेकजण तणावपूर्ण जीवन जगत आहेत आणि त्यातूनच मग चुकीचे पाऊल उचलले जाते. एक चूक सावरताना हातून अनेक चुका होतात आणि संपूर्ण आयुष्य बदलून जाते. या कठीण परिस्थितीवर भाष्य करणारी ही वेबसीरिज होती. यातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी बोध मिळाला होता. 


प्लॅनेट मराठी हे मराठीतील पहिलेवहिले ओटीटी प्लॅटफॉर्म नेहमीच दर्जेदार कलाकृती घेऊन येत असते. 
प्लॅनेट मराठीचे सिनेमे, वेबसीरिजला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देताना दिसून येत आहे. आता 7 ऑक्टोबरपासून येणाऱ्या या नव्या वेबसीरिजलादेखील प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा आहे.