Tushar Dalvi and Harshada Khanvilkar : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर नुकताच 'लक्ष्मी निवास' या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या नव्या मालिकांच्या प्रवाहामध्ये झी मराठी पुन्हा एकदा नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. त्यामुळे आता या मालिकेत कोण झळकणार आणि कोण कमबॅक करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीये.
दरम्यान एबीपी माझाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा खानविलकर आणि जेष्ठ अभिनेते तुषार दळवी झी मराठीवर पुन्हा एकदा दिसू शकतात. नुकताच शेअर करण्यात आलेल्या लक्ष्मी निवास या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जातंय.
वाहिनीने शेअर केला नव्या मालिकेचा प्रोमो
वाहिनीने हा प्रोमो शेअर करताना म्हटलं की, स्वत:च्या घराचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट. तसेच हा प्रोमो शेअर करताना म्हटलं की, ‘घर नावाचं स्वप्न’ कुणी पाहिलं तर कुणी जगलं... नवी मालिका ‘लक्ष्मी निवास’, येतेय तुमच्या भेटीला. दरम्यान या वाहिनीच्या प्रोमोला हर्षदा खानविलकर यांनी आवाज दिला असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
झी मराठीवर सुरु होणार नवी मालिका
दरम्यान झी मराठीवर एका नव्या मालिकेची सुरुवात होणार आहे. मागील काही महिन्यांमध्ये वाहिनीवर अनेक नव्या मालिकांची सुरुवात झाली. त्यातच आता वाहिनीवरील काही मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहेत. त्यामुळे ही मालिका सुरु झाल्यावर कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.