Tunisha Sharma Suicide Case: काही दिवसांपूर्वी तुनिषा शर्मा (Actress Tunisha Sharma) हिनं शुटिंगच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी तुनिषाचा मित्र आणि कोअॅक्टर शीझान खानला (Sheezan Khan) अटक करण्यात आली होती.  सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून याप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी शीझान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी शनिवारी सांगितलं की, शीझान निर्दोष आहे आणि त्याचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. 


मी निर्दोष आहे...


शीझान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी अभिनेत्याच्या बाजूनं बोलताना सांगितलं की, शीझान निर्दोष आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, "वसई कोर्टात हजर करण्यापूर्वी शीझान खाननं आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर शीझाननं इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. त्यावेळी तो बोलताना म्हणाला की, "माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी निर्दोष आहे. 'सत्यमेव जयते..!"


शीझान जामिनासाठी अर्ज करणार 


शीझानचे वकील मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, शीझान सोमवारी कोर्टात या खटल्याच्या संदर्भात पहिला जामीन अर्ज दाखल करणार आहे. "आम्ही खटल्याशी संबंधित काही प्रमाणित कागदपत्रांसाठी अर्ज केला आहे. ती मिळाली की, सोमवारी सकाळी जामीन अर्ज दाखल करणार आहोत." यापूर्वी वसई न्यायालयानं शीजान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.


तुरुंगात राहताना शीझाननं केल्या 'या' मागण्या 


28 वर्षीय अभिनेता शीझान खानला नुकतंच न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा शीझानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी त्यांच्या अशिलाच्या वतीनं कारागृहाच्या आवारात घरी शिजवलेलं अन्न खाण्यासाठी द्यावं अशी परवानगी मागणारे चार अर्ज सादर केले होते. याशिवाय शीझान खानला अस्थमाचा त्रास आहे, त्यासाठी त्याला इनहेलर वापरण्याची परवानगी देण्यात यावी असाही अर्ज करण्यात आला होता. आरोपीच्या वकिलांनी त्याच्या कोठडीदरम्यान कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्याची परवानगीही मागितली होती. कोठडीत असताना आणि तुरुंगात सुरक्षेसाठी त्याचे केस कापू नयेत, असंही शीझानच्या वतीनं करण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्यात आलं होतं.  


शीझान खान हा तुनिषा शर्माचा सहकलाकार आहे. तुनिषानं 24 डिसेंबर रोजी 'अली बाबा: दास्तान ए काबुल'च्या शूटिंग सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर 25 डिसेंबरला शीझान खानला अटक करण्यात आली होती.