मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या फिमेल फॅन्सच्या हृदयाचा चुराडा झाला असेल. सिद्धार्थ आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. कुटुंबीय आणि मोजक्‍या मित्रमंडळीच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा साखरपुडा झाला.

सिद्धार्थ आणि मिताली यांनी साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मुंबईत वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये दोघांचा साखरपुडा झाला. सिद्धार्थ आणि मिताली लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन्स डेला सिद्धार्थने इन्स्टाग्रामवरुन आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. सिद्धार्थने मितालीला प्रपोज करतानाचा एक फोटो शेअर केला होता. 'मी तिला प्रपोज केलं आणि तिनं होकारही दिला' असं कॅप्शन सिद्धार्थने दिलं होतं.

'अग्निहोत्र' या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतून सिद्धार्थने 2008 साली टीव्ही क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर कशाला उद्याची बात, प्रेम हे यासारख्या मालिकांमध्ये तो झळकला.



2010 मध्ये 'झेंडा' चित्रपटातून सिद्धार्थने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. बालगंधर्व, सतरंगी रे, जय जय महाराष्ट्र माझा, क्लासमेट्स, वजनदार अशा अनेक चित्रपटांतून त्याने अभिनय केला आहे. सोनाली कुलकर्णीसोबत 'गुलाबजाम' चित्रपटातील त्याची भूमिका विशेष गाजली होती.

मितालीने 'उर्फी' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने छोट्‍या पडद्‍यावर अनुबंध, फ्रेशर्स यासारख्या काही मालिका केल्या आहेत. नुकतीच ती 'महाराष्ट्राचे सुपर डान्सर्स' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती.