Tu Chal Pudha : ‘तुझ्यात जीव रंगला’मधील ‘वहिनीसाहेब’ ही व्यक्तिरेखा अजूनही प्रेक्षक विसरले नाही. वहिनीसाहेबाचा धाक आणि दरारा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. वहिनीसाहेब ही भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgaonkar) झी मराठीवरील 'तू चाल पुढं' (Tu Chal Pudha) या मालिकेत पुन्हा एकदा नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून, ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना धनश्री म्हणाली की, ‘या मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेचं नाव शिल्पी आहे, जी तिच्या माहेरी येऊन राहतेय आणि तिला सतत असं वाटतं की, तिच्या आयुष्यात जे काही चुकीचं घडलं त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त अश्विनी आहे. त्यामुळे शिल्पी अश्विनीला सतत घालून पडून बोलते, प्रत्येक गोष्टींमध्ये तिच्या चुका काढते. जसं प्रोमोमध्ये देखील प्रेक्षकांनी पाहिलं की, शिल्पी कशी तिच्या वहिनी अश्विनीला टोमणे मारते. अशा प्रकारची एक नकारात्मक भूमिका पुन्हा एकदा मी साकारतेय त्यामुळे जशी वहिनीसाहेब सगळ्यांच्या लक्षात राहिली, तशीच शिल्पी देखील प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी मी आशा करते.’


पहा प्रोमो :



काय आहे मालिकेचं कथानक?


नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची. एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीला देखील त्यांच्या नवीन घरासाठी खारीचा वाटा देण्याची इच्छा असते, हे या प्रोमो मधून झळकते. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब सोबतच ‘तुझ्यात जीव रंगला’मधील वाहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतेय. ‘तू चाल पुढं’ ही मालिका येत्या 15 ऑगस्टपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


दीपा परबचं पुनरागमन!


‘दामिनी’ या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. पण, बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील आगामी मालिका ‘तू चाल पुढं’मध्ये दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.


हेही वाचा :


PHOTO : ‘वहिनीसाहेबां’चं दमदार कमबॅक, नव्या मालिकेतून धनश्री काडगांवकर येणार प्रेक्षकांच्या भेटीला!


Tu Chal Pudha : गृहिणीचं आयुष्य दाखवणारी नवी मालिका, ‘तू चाल पुढं’मधून दीपा परबचं छोट्या पडद्यावर पुनरागमन!