Tu Chal Pudha : मालिकेचं कथानक आणि त्यांचे सासू-सुनांचे तेच तेच विषय अशा अनेक गोष्टींमुळे मराठी मालिकांना ट्रोल करण्यात येते. पण सध्या मराठी मालिका विश्वात नव-नवे प्रयोग होत आहेत. आता या मालिकेच्या माध्यमातून एका गृहिणीला प्रोत्साहन मिळालं आहे. अश्विनी नामक एका गृहिणीने अश्विनी ब्युटी पार्लर उघडण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आता तिचं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. 


'तू चाल पुढं' ही झी मराठीवरील मालिका वेगळा विषय असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली आहे. स्वप्न साकार करण्यासाठी धडपडणाऱ्या अश्विनीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेत प्रमुख भूमिकेत दीपा परब (Deepa Parab) असून तिने अश्विनी हे पात्र साकारलं आहे.


'तू चाल पुढं' ही मालिका पाहून स्वप्न साकार झाल्यानंतर अश्विनीने एक खास पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं आहे,"मी सांगू इच्छिते की ही मालिका चालू झाली तेव्हा मी पार्लरचा क्लास करत होते. माझं अश्विनी असल्यामुळे आणि 'तू चाल पुढं' या मालिकेत अश्विनी ब्युटी पार्लर असल्याने मला ही मालिका खूप आवडायची. या मालिकेतून आणि अश्विनीकडून मी खूप काही घेतलं आहे". 






अश्विनीने लिहिलं आहे, "मालिकेतील अश्विनीसारखं आयुष्य मी जगत होते. ही मालिका पाहताना मी अनेकदा रडले आहे. पण एकेदिवशी आता काहीतरी करायचं हे मनाशी ठरवलं आणि स्वत:ला म्हणाले 'तू चाल पुढं'. मला 'तू चाल पुढं' ही मालिका पाहून खूप प्रोत्साहन मिळालं आहे. त्यामुळे सहा महिन्यात पार्लरचा कोर्स पूर्ण करुन स्वत:च्या पायावर उभं राहिले आहे आणि शुन्यातून विश्व निर्माण केलं आहे". 


अश्विनीने पुढे लिहिलंय की, "आज मला स्वत:चा खूप अभिमान वाटतो. योग्य वेळी योग्य व्यक्तीकडून मी खूप काही शिकले आहे. आज माझं 'अश्विनी ब्युटी पार्लर' आहे. याचे सर्व श्रेय मी दीपा मॅडम म्हणजेच माझ्या अश्विनी मॅडम आणि मालिकेच्या सर्व टीमला देते".  


अश्विनीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. एक मालिकेची ताकद काय असते हे अश्विनीच्या पोस्टने सर्वांना दाखवून दिलं आहे. अश्विनीची ही पोस्ट वाचून नेटकरी तिला म्हणत आहेत,"तू चाल पुढं...". तसेच, नव्या उद्योगासाठी शुभेच्छादेखील देत आहेत.