TMKOC Actor Gurucharan Singh :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सोढी ही व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) बेपत्ता होऊन 10 दिवस झाले. दिल्ली पोलिसांनी गुरुचरण सिंह यांचा शोध सुरू केला आहे.  गुरुचरण सिंग मागील 10 दिवसांपासून कुठे आहेत, हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या मनात आहे. पोलिसांकडून हा शोध सुरू असताना दुसरीकडे आता ही घटना हे षड्यंत्र आहे की घातपात आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


गुरुचरण सिंह हे 22 एप्रिलपासून दिल्ली विमानतळ परिसरातून बेपत्ता झाले आहेत. अभिनेता गुरुचरण सिंहने आपला मोबाईल फोन हा पालम परिसरात सोडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. न्यूज 18 ला दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फूटेजनुसार, गुरुचरण सिंह हे एका ई-रिक्षातून दुसऱ्या रिक्षात बसताना दिसले आहेत. सर्व काही पूर्वनियोजित प्लान आखून त्यांनी दिल्ली सोडली असल्याचा संशय पोलिसांना असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


मुंबईत चौकशी सुरू?


गुरुचरण सिंह यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विविध तपास पथके नियुक्त केली आहेत. त्यातील एक पथक मुंबईत दाखल झाले असून त्यांनी गुरुचरण सिंह यांच्याबाबत कलाकारांकडे  चौकशी केल्याचे वृत्त आहे. गुरुचरण सिंह यांच्याबाबत अधिक माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


गुरुचरण सिंह  शेवटचे कधी दिसले होते?


22 एप्रिल रोजी गुरुचरण सिंह हे अखेरचे दिसले होते. चार दिवसांनंतर त्यांच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांमध्ये दाखल असलेल्या तक्रारीनुसार, 22 एप्रिल रोजी गुरुचरण सिंह हे  सकाळी 8:30 वाजता मुंबईला जाण्यासाठी निघाले. पण, मुंबईला पोहोचला नाही, घरीही परतला नाही आणि त्याचा फोनही लागत नाही. गुरुचरण सिंह हे मानसिकदृष्ट्या स्थिर असल्याची  माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. 


'तारक मेहता का...'मध्ये महत्त्वाची भूमिका


'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये गुरुचरण सिंह यांनी रोशन सिंग सोढीची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेद्वारे त्यांनी नेहमीच लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणले. ते नेहमीच पार्टी मोडमध्ये असणारे पात्र होते. पण पत्नीवरचे प्रेम व्यक्त करण्यास तो कधीच मागे हटत नाही. शो मधील सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक होता. गुरुचरण सिंह यांनी 2020 मध्ये हा शो सोडला.