Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. पण आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. प्रेमाच्या रंगानी भरून 'ठिपक्यांची रांगोळी' पूर्ण होणार आहे.


'या' दिवशी पार पडणार 'ठिपक्यांची रांगोळी'चा शेवटचा भाग


'ठिपक्यांची रांगोळी' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. 18 नोव्हेंबरला शनिवारी या मालिकेचा शेवटचा भाग पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. प्रेमाच्या रंगानी भरून पूर्ण होणार 'ठिपक्यांची रांगोळी' असं म्हणत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.






'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आठवणीत राहील. जीवाला जीव देणारं मोठं कुटुंब असावं, मायेची उब देणाऱ्या टुमदार कानिटकर वाड्याप्रमाणे एक घर असावं अशी भावना ही मालिका पाहताना प्रत्येकाच्या मनात नक्कीच आली असेल. नाशकातल्या कानिटकर कुटुंबाची गोष्ट या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.


'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेबद्दल जाणून घ्या... (Thipkyanchi Rangoli Serial Details)


'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका एकत्र कुटुंबाची गोष्ट असली तरी एक गोड लव्हस्टोरी या मालिकेत दाखवण्यात आली आहे. दोन टोकाचे दोन व्यक्ती परिस्थितीमुळे कसे एकत्र येतात आणि मग कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात या सर्वांमध्ये त्यांच्या एकत्र कुटुंबाचा त्यांना कसा पाठिंबा मिळतो या सर्व गोष्टींची सांगड उत्तम पद्धतीने या मालिकेत दाखवण्यात आली. कानिटकर कुटुंबासाठी आयुष्य म्हणजे, सोहळा आहे आणि घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा सण समारंभ. अशा या हसत्या-खेळत्या कुटुंबाची गोष्ट प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.


कलाकारांची तगडी फौज असलेली 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli Serial Starcast)


'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळाली आहे. सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांचं चांगल मनोरंजन केलं. 


संबंधित बातम्या


Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' घेणार प्रेक्षकांचा निरोप; मालिकेचा शेवट होणार गोड