मुंबई : बिग बॉस…भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातला सगळ्यात वादग्रस्त शो…हाच शो आता मराठीत येत आहे. महेश मांजरेकर बिग बॉसच्या भूमिकेत आहेत, हे आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आता त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
या घरात जाणारी पहिल्या स्पर्धक आहेत उषा नाडकर्णी… उषा नाडकर्णी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी जरा जास्तच प्रसिद्ध आहेत. जे मनात तेच तोंडात असा त्यांचा स्वभाव कधी कधी इतरांना चांगलाच अडचणीत आणतो. त्यांच्या असण्याने घरातलं वातावरण गरम राहाणार यात शंका नाही.
या यादीतलं दुसरं नाव आहे अभिनेता राजेश श्रृंगारपुरे. राजेश नुकताच डॅडी या बॉलिवूडपटात झळकला होता. त्याच्या कामाचं कौतुकही झालं होतं. हाच राजेश बिग बॉसच्या घरात काय करामत करतोय ते लवकरच कळेल.
बिग बॉसच्या घरात जाणारी तिसरी व्यक्ती आहे सुशांत शेलार. मनोरंजन विश्वात जिथे जिथे राजकारण असतं तिथे तिथे सुशांत शेलार हे नाव असतंच असतं आणि बिग बॉसचं घर म्हणजे तर राजकाराणाचा महाआखाडा. कदाचित म्हणूनच बिग बॉसने सुशांतची निवड केली असावी.
स्पर्धकांच्या यादीतलं आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री रेशम टिपणीस. बोल्ड अँड बिनधास्त अशी रेशमची ओळख. त्याचा फायदा तिला या शोमध्ये कसा होतो ते 15 एप्रिलनंतर कळेल.
आजवर अनेक मालिकांमधून घराघरात पोहोचलेला आस्ताद काळे आता बिग बॉसच्या घरात जायला सज्ज झाला आहे. मालिकेच्या शूटिंगमधून ब्रेक घेत आस्तादने बिग बॉसच्या घराचा रस्ता धरला आहे.
मराठी बिग बॉसच्या घरात दिसणारी आणखी एक तारका आहे मेघा धाडे. अभिनेत्री म्हणून मेघाने आजवर छाप पाडण्यासारखं काही केलेलं नाही. मराठी बिग बॉस तिच्यासाठी सर्वोत्तम संधी असू शकते.
याशिवाय शेफ विष्णू मनोहर आणि शेफ पराग कान्हेरे यांच्या नावाचीही चर्चा आहे.
या शोमध्ये 15 स्पर्धक असतील त्यातल्या या सात स्पर्धकांची नावं एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत. उर्वरीत नावांमध्ये आणखी काय काय सरप्राईजेस असतील ते लवकरच कळेल.
15 एप्रिलपासून मराठी बिग बॉसच्या पर्वाला सुरुवात
वादग्रस्त कार्यक्रमांच्या यादीत अग्रस्थानी येणाऱ्या ‘बिग बॉस’ची लोकप्रियता अनेकांना माहित आहे. हिंदीमध्ये या ‘बिग बॉस’ची अनेक पर्व पार पडली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या दाक्षिणात्य अवतारालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता याच ‘बिग बॉस’चा मराठी अवतार येत्या 15 एप्रिलपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरु होत आहे.
नियम मोडल्यास हिंदी बिग बॉसमध्ये 50 लाख रुपये दंड होता. मात्र मराठीत तो तब्बल दोन कोटी रुपये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धक सहभाग घेण्यापूर्वी विचार करुनच निर्णय घेतील हे मात्र नक्की.
हिंदी बिग बॉसमध्ये टोकाचे वाद, शिवीगाळ अशा प्रकारांमुळे ही मालिका नेहमीच वादात राहिली. मात्र मराठी कलाकारांची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे या पहिल्याच पर्वात काय होतं, याबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.
'मराठी बिग बॉस'च्या घरात कोण जाणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Apr 2018 05:25 PM (IST)
एबीपी माझाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश श्रुंगारपुरे, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, मेघा धाडे, सुशांत शेलार, रेशम टिपणीस, अास्ताद काळे ही मराठीतली प्रसिद्ध नावं या मालिकेत असण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -