मुंबई : 'द कपिल शर्मा शो' आणि 'कॉमेडी क्लासेस' यांसारख्या शोमधून लोकप्रिय झालेला विनोदी कलाकार सिद्धार्थ सागर चार महिन्यांपासून बेपत्ता झाल्याचं वृत्त होतं. कलर्स टीव्हीवरील कॉमेडी क्लासेसमध्ये सेल्फी मौसीची व्यक्तिरेखा साकारणारा सिद्धार्थ अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्याचे चाहते, सहकारी कलाकार हैराण होते.

गायब झाल्याचं वृत्त पसरल्यानंतर सिद्धार्थने स्वत: समोर येऊन एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्याने ठिकाणाचा खुलासा केलेला नसला तरी सुरक्षित असल्याचं मात्र सांगितलं. मी बऱ्याच काळापासून अनेक अडचणींचा सामना करत होतो. माझं मानसिक शोषण झालं, असं सिद्धार्थने सांगितलं.


"मी अतिशय खडतर काळातून गेलोय. मी कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्यामुळे मी फारच निराश झालो होतो. मी सध्या ज्या ठिकाणी आहे, तिथे सुरक्षित आहे. या काळात मला खूप लोकांचा पाठिंबा मिळाला. मी दोन दिवसात मीडियासमोर येऊन संपूर्ण प्रकरण काय आहे ते सांगेन," असं सिद्धार्थ सागरने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

"सिद्धार्थची मैत्रीण सोमीने फेसबुकवर पोस्ट लिहिली होती की, तुम्हाला सिद्धार्थ सागर किंवा सेल्फी मौसी उर्फ नसीर लक्षात आहे का? तो चार महिन्यांपासून  बेपत्ता आहे. 18 नोव्हेंबर 2017 रोजी तो शेवटचा दिसला होता. तो माझा चांगला मित्र आहे. कृपया हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा," असं सोमीने पोस्टमध्ये लिहिलं आहे.



मात्र काही काळाने तिने ही पोस्ट डिलीट केली होती. पण यानंतर सिद्धार्थने व्हिडीओ शेअर करुन सुरक्षित असल्याचं सांगितलं.

सिद्धार्थचे आई-वडील वेगळे झाले आहेत असं म्हटलं जात आहे. तसंच सिद्धार्थ आणि त्याची आई अल्का सागर यांच्यातील संबंधही फार चांगले नव्हते. त्यांनी सिद्धार्थला नजरकैदेतही ठेवल्याचं बोललं जात होतं.