मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी आज दुपारी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. अरुण काकडे हे 'आविष्कार' या नाट्यसंस्थेचे आणि समांतर रंगभूमीवर रंगायन नाट्यसंस्थेचे संस्थापक सदस्य होते. त्यांच्या निधनाने समांतर रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.
अरुण काकडे हे 50 हून अधिक वर्ष रंगभूमीवर कार्यरत होते. 94 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद काकडे यांनी भूषवलं होतं. तसंच त्यांचं 'अमका' हे आत्मचरित्रही प्रसिद्ध झालं होतं. काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
अरुण काकडेंनी रंगभूमीवरची वाटचाल पुण्यातून सुरु केली. त्याकाळातील विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे या दिग्गज रंगकर्मींसोबत त्यांनी रंगायन ही नाट्यसंस्था दादरच्या छबिलदास शाळेत सुरु केली. त्यावेळी या संस्थेतर्फे विविध विषयांवरील नाटकं सादर केली जात होती. रंगायन या नाट्यसंस्थेत पुढे वाद झाले आणि ही संस्था फुटली. अरुण काकडे यांनी अरविंद देशपांडे आणि विजया मेहता यांच्यासोबत 1971 साली आविष्कार ही नवीन नाट्यसंस्था सुरु केली.
आविष्कारने छबिलदास चळवळ उभी केली. या चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले. रंगभूमीवरचे अनेक महत्त्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून झाले.
ज्येष्ठ रंगकर्मी आणि 'आविष्कार' नाट्यसंस्थेचे संस्थापक अरुण काकडे यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Oct 2019 04:43 PM (IST)
अरुण काकडे हे 50 हून अधिक वर्ष रंगभूमीवर कार्यरत होते. 94 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद काकडे यांनी भूषवलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -