Dharmaveer : ‘ठाण्याचा वाघ’ म्हणून ख्याती असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारलेला 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) हा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा मराठी सिनेसृष्टीत ‘माईलस्टोन’ ठरतोय. आता हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता 'धर्मवीर'ची यशोगाथा उलगडली जाणार आहे.
चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाची यशोगाथा रविवार 19 जूनला दुपारी 12 वा. आणि सायं. सहा वाजता झी टॉकीजवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमाला मिळालेले तुफान यश साजरं करीत या अभूतपूर्व यशाला सलाम करण्याकरिता 'धर्मवीर' सिनेमाची यशोगाथा तयार करण्यात आली आहे. या यशोगाथेमध्ये सिनेमाच्या टीमने सिनेमाचा आतापर्यंतचा प्रवास व अनुभव कथन केले आहेत. या यशोगाथेमध्ये कलाकार, तंत्रज्ञ यांचे अनुभव, पडद्यामागचे किस्से यांचा समावेश आहे.
'धर्मवीर' सिनेमासाठी केलेली अपार मेहनत व हा सिनेमा कारकिर्दीला कसा नवं वळण देणारा ठरला हे यशोगाथेतून सांगताना, मराठी सिनेमांच्या यशाचा मापदंड म्हणून या सिनेमाकडे पाहिले जाईल असं अभिनेता प्रसाद ओक म्हणतो. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेला हा लोकनेता सर्वसामान्यांच्या मनात आजही जिवंत आहे, मला आणि माझ्या भूमिकेला मिळलेलं प्रेम त्याचीच पोचपावती असल्याचं प्रसाद ओक म्हणाला.
‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा एवढा मोठा जीवनप्रवास एका सिनेमाच्या माध्यमातून मांडणं खूप अवघड काम, पण हा सगळा घाट मी घातला आणि या कलाकृतीच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचं काम झी स्टुडिओजने केल्याने हे शिवधनुष्य पेलल्याचे निर्माते मंगेश देसाई सांगतात.
संगीताच्या माध्यमातून तो काळ आणि एवढया लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा पट उलगडण्यासाठी संगीतकार म्हणून अविनाश-विश्वजीत, चिनार-महेश आणि नंदेश उमप यांनी संगीताची बाजू भक्कमपणे सांभाळली आहे.
17 जूनला होणार प्रिमिअर
आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडणारा 'धर्मवीर' सिनेमा आता झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. 17 जूनला या सिनेमाचा प्रिमिअर होणार आहे. प्रसाद ओकने 'धर्मवीर' सिनेमाचा ट्रेलर शेअर करत लिहिले आहे, 'धर्मवीर' आता झी 5 वर..!!! माणूस जपणे हाच ज्याच्यासाठी सर्वात मोठा धर्म, तो धर्मवीर येतोय 17 जूनपासून थेट तुमच्या भेटीला...2022 चा सर्वात मोठा मराठी ब्लॉकबस्टर सिनेमा फक्त झी 5 वर!".
संबंधित बातम्या