मुंबई : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. तक्रारदाराला धमकी देण्याचे कलम प्राजक्ताविरोधात नव्याने दाखल करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तसेच 26 जूनला होणाऱ्या पुढील सुनावणीच्यावेळी ठाणे दंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्याचं समन्स प्राजक्ता माळीच्या नावानं जारी करण्याचे निर्देशही शनिवारी कोर्टानं जारी केले आहेत.


प्राजक्ता माळीविरोधात तिची ड्रेस डिझायनर जान्हवी मनचंदा हिने ठाणे कोर्टात याचिका दाखल केली आहे. शनिवारी दंडाधिकारी न्यायाधीश व्ही.व्ही. राव जडेजा यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत गुन्हा दाखल होण्यापूर्वीच जान्हवीला मानहानीची नोटीस धाडल्याबद्दल प्राजक्ता माळीविरोधात कलम 506 अंतर्गत तक्रारदाराला धमकी दिल्याबद्दल नव्या गुन्ह्याची नोंद करण्याचे निर्देश कोर्टानं संबंधित पोलीस स्थानकाला दिल्याची माहिती जान्हवीचे वकील सचिन पवार यांनी दिली.

आपल्याच ड्रेस डिझायरसोबत केलेली मारामारी प्राजक्ताला चांगलीच भोवण्याची चिन्ह आहेत. कारण तक्रारदार जान्हवी मनचंदाने केवळ पोलिसांत तक्रार देऊन न थांबता प्राजक्ता माळीविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे.

प्राजक्तानंच आपल्याला काम मिळवून दिलं होतं, म्हणून आत्तापर्यंत तिचा हा स्वभाव सहन केला, मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेली असं तिचं म्हणणं आहे. मुळातच काहीसा रागीट स्वभाव असलेल्या प्राजक्तानं याआधीही इतरांसोबत असे वाद घातल्याचा तक्रारदाराचा दावा आहे.

काय आहे प्रकरण

5 एप्रिल 2019 ला मिरारोड इथल्या मोनार्क स्टुडिओमध्ये एका मराठी हास्य रिअॅलिटी शोच्या दरम्यान हा प्रसंग घडला. प्राजक्ताचा एक ड्रेस दिग्दर्शकानं रिजेक्ट केल्यानं वाद सुरू झाला. दुसरा ड्रेस घालण्यास राजी नसलेल्या प्राजक्तानं स्वत: कात्री घेऊन डिझायनर ड्रेसमध्ये छेडछाड केल्यानं दोघींमध्ये वाद झाला आणि अखेरीस प्राजक्तानं सगळा राग आपल्यावर काढला असा डिझायनर जान्हवीचा आरोप आहे. या वादानंतर व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावून प्राजक्तानं आपल्याला मारहाण केली, असा आरोप करत जान्हवीनं प्राजक्ता माळीविरोधात काशिमिरा पोलीस स्थानकात रितसर तक्रार नोंदवली आहे. प्राजक्ता माळीनं मात्र या सर्व आरोपांचं खंडन करत जान्हवीनं स्वत:चं स्वत:ला इजा करून आपल्याविरोधात खोटे आरोप लावल्याचा दावा केला आहे.

VIDEO | प्राजक्ता माळी अडचणीत, डिझायनरला केलेली मारहाण भोवण्याची चिन्हं | मुंबई | एबीपी माझा