Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sodhi Missing : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील 'रोशन सिंह सोढी'ची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. गुरुचरण सिंह हे बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सिंह यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. तर, सोढी यांनी चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्ट केली होती.
गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचे चाहते चिंतेत असून त्यांच्या वडिलांनीही तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 50 वर्षीय गुरुणचरण सिंह हे मुंबईला जाणारे विमान पकडण्यासाठी सकाळी 8:30 वाजता घरातून निघाले. परंतु गुरुचरण मुंबईला पोहोचला नाही किंवा घरी परतला नाही.
गुरुचरण सिंहची शेवटची पोस्ट...
गुरुचरण सिंह बेपत्ता झाल्यानंतर गुरुचरण सिंह यांची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी आपल्या वडिलांसोबतच्या फोटोंचे कोलाज तयार करून एक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओला त्यांनी Divine Birthday to Father अशी कॅप्शन दिली.
गुरुचरण यांचा फोन बंद...
गुरुचरण यांचे मित्र सोनी यांनी 'पिंकव्हिला'सोबत बोलताना सांगितले की, गुरुचरणचा फोन 24 एप्रिल पासून बंद आहे. गुरुचरणची प्रकृती मागील अनेक दिवसांपासून ठीक नसल्याची माहिती त्यांनी दिली.
सोढी यांनी मालिका सोडली होती?
गुरुचरण सिंग यांनी 'रोशन सिंह सोढी' ची भूमिका साकारली होती. सोढी ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 2013 मध्ये त्यांनी हा शो सोडला होता. मात्र, पुढील वर्षी पुन्हा एकदा कमबॅक केले. 2021 मध्ये, शो का सोडावा लागला याचे उत्तर ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्या सुमारास त्याच्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्याशिवाय, खासगी आयुष्यातही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागत होती. त्यामुळे शोमधून बाहेर पडलो असल्याचे त्यांनी सांगितले.