'पाठकबाई' अक्षया आणि सुयश टिळकचा साखरपुडा?
एबीपी माझा वेब टीम | 04 Jan 2018 10:12 AM (IST)
सुयशने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे त्यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
मुंबई : एकीकडे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा साखरपुडा होणार असल्याची चर्चा रंगली असतानाच स्मॉल स्क्रीनवरच्या एका जोडीनेही नव्या नात्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचं म्हटलं जात आहे. 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर आणि 'का रे दुरावा'फेम जय अर्थात अभिनेता सुयश टिळक यांनी गुपचूप साखरपुडा केल्याच्या बातम्यांना ऊत आला आहे. अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील मालिकेतील अंजली पाठक ही व्यक्तिरेखा साकारते. शिक्षिका असलेल्या पाठकबाईंवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. अंजली आणि राणाची जोडी गाजत असली, तरी अक्षयाचा जीव दुसऱ्याच 'राणा'मध्ये रंगला आहे. सुयश आणि अक्षया साधारण गेल्या वर्षभरापासून रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. दोघांनीही अद्याप आपल्या नात्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही, मात्र इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स दोघांचे फोटो पाहायला मिळतात. त्यातच सुयशने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे त्यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. सुयश टिळकने 'का रे दुरावा' या मालिकेत जय ही भूमिका साकारली होती. त्यानंतर कलर्स वाहिनीवरील 'सख्या रे...' मालिकेत तो दुहेरी भूमिकेत दिसला. काही चित्रपट, म्युझिक व्हिडिओमध्येही तो झळकला आहे. सध्या सुयश 'झी युवा' वाहिनीवरील 'बापमाणूस' या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.