मुंबई: माणूस हा सवयींचा गुलाम असतो असं म्हटलं जातं. त्यामुळेच टीव्ही हे माध्यम फक्त एण्टरटेन्मेण्ट म्हणून न उरता ती आता एक सवय बनली आहे.
सकाळचा चहा असो वा रात्री कामावरुन परतल्यानंतर घेतलेला पाण्याचा घोट असो, प्रत्येकाचीच नजर घरातला रिमोट शोधत असते. प्रेक्षकांची हीच सवय हेरुन नव्या वर्षात वाहिन्यांनी नवनव्या शोजचा रतिबच देऊ केला आहे.
चला हवा येऊ द्या
वर्षाच्या सुरुवातीलाचा झी मराठी आपला हुकमी एक्का असणारा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… चला हवा येऊ द्याची टीम विश्वदौ-यासह प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज आहे. या निमित्ताने घरबसल्या विविध देशांची सफर होईलच शिवाय सोबतीता हास्याचा निखळ डोस असेल हे वेगळं सांगायला नको.
डान्स महाराष्ट्र डान्स
झी मराठीवर तुफान गाजलेला शो डान्स महाराष्ट्र डान्स आता नव्या ढंगात झी युवावर सुरु होतोय. महाराष्ट्रभर या शोच्या ऑडिशन्स पार पडल्या आहेत. त्यामुळे या शोच्या निमित्ताने नवं टॅलेण्ट प्रेक्षकांसमोर येईल…
गुलमोहर
या रिअॅलिटी शोसोबतच गुलमोहर नावाची नवी रोमॅण्टिक मालिकाही नवीन वर्षात झी युवावर भेटीला येईल.
स्टार प्रवाहची जय्यत तयारी
अटीतटीच्या या स्पर्धेत स्टार प्रवाहही जय्यत तयारीनिशी उतरलंय. विठूमाऊली आणि नकळत सारे घडले नंतर शतदा प्रेम करावे ही नवी मालिका ते घेऊन येत आहेत.
शिवाजी साटम यांचा सुपुत्र अभिजीत साटम या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. अभिजीतची ही पहिलीच मालिका असल्यामुळे उत्सुकता नक्कीच आहे.
कलर्स मराठी
कलर्स मराठीने गेल्या वर्षात जवळपास 8 ते 9 नवे शो लॉन्च केले… त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला कोणताही नवा शो कलर्स मराठीवर सुरु होत नाहीय…
दस का दम
हिंदीमध्ये सांगायचं तर सोनी टीव्हीवर दस का दमचा नवा सिझन सुरु होणार आहे. सलमान खानच हा शो होस्ट करणार असून बिग बॉस संपताच या शोच्या शूटिंगला सुरुवात होईल.
पृथ्वी वल्लभ
या शिवाय पृथ्वी वल्लभ हा बिगबजेटेड शोदेखील सोनीवर सुरु होतोय. पोरस नंतर सोनीचा आणखी एक भव्यदिव्य शो. पृथ्वी वल्लभ या राजाची ही गोष्ट आहे.
इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार
करण जोहर आणि रोहित शेट्टीचा इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार हा शोदेखील स्टार प्लसवर सुरु होतोय. 12 स्पर्धकांना एकत्र एका ठिकाणी ठेवण्यात येईल आणि त्यांना वेगवेगळे टास्क्स देण्यात येईल. या अनोख्या स्पर्धेतल्या अंतिम दोन स्पर्धकांना धर्मा प्रोडक्शनच्या तीन सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळेल.
झलक दिखलाजा नवा सिझनही नव्या सेलिब्रिटी जोड्यांसोबत कलर्सवर सुरु होणार आहे. थोडक्यात काय तर गेल्यावर्षीप्रमाणेच येणारं वर्षदेखील छोट्या पडद्याला समृद्ध करणारं ठरणार आहे.