Surabhi Bhave: अभिनेत्री सुरभी भावे (Surabhi Bhave) ही नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. स्वामिनी (Swamini) या मालिकेमुळे सुरभीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच सुरभीनं पावनखिंड (Pawankhind) आणि चंद्रमुखी (Chandramukhi) या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. सुरभीचं एक युट्यूब चॅनल देखील आहे. या युट्यूब चॅनलवर ती विविध व्हिडीओ शेअर करते. नुकताच एक खास व्हिडीओ सुरभीनं तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. सुरभीनं या व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या शाळेची माहिती चाहत्यांना दिली आहे.
सुरभीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "कुणाला सांगून खरं वाटणार नाही पण मी सैनिकी शिक्षण घेतलं असून आजवर छेड काढणाऱ्या 4 पोरांना धुतलंय. पण हे सगळं शिकत असताना माझ्यातले अभिनय गुण हेरले ते माझ्या सैनिकी शाळेतील शिक्षकांनी.आजचा व्हिडीओ माझ्या शाळेतल्या वेगळेपणा बद्दल आहे."
सुरभीनं तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या शाळेबद्दल सांगितलं. ती म्हणाली, "इतर शाळांपेक्षा माझी शाळा वेगळी होती. मी मुळची कोकणातील गुहाघरची आहे. पहिली ते चौथी माझं शिक्षण गुहाघरमध्ये झाले. त्यानंतर मी पुण्याच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत गेले. माझी शाळा ही आशिया खंडातील पहिली मुलींची सैनिकी शाळा आहे."
पुढे सुरभीनं सांगितलं, "त्या शाळेत हॉस्टेलमध्ये राहणं अनिवार्य होतं. शाळेत अभ्यासाबरोबरच स्विमिंग, योगा, रायफल शूटिंग, कराटे यांचे देखील प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याशिवाय तिथे सैनिकी प्रशिक्षणही दिलं जातं. त्यामुळे आजवर माझी छेड काढणाऱ्या चार मुलांना मी हाणलं आहे. याचं सगळं श्रेय या शाळेतील ट्रेनिंगला जातं."
सुरभीनं "सागरा प्राण तळमळला" या नाटकात देखील काम केलं आहे. या नाटकामध्ये तिनं माई सावरकरांची भूमिका साकारली. पावनखिंड या चित्रपटात सुरभीनं मातोश्री सोनई देशपांडे ही भूमिका साकारली होती.पावनखिंड हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले होते. तसेच या चित्रपटात चिन्मय मांडलेकर,मृणाल कुलकर्णी,अजय पूरकर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.
इतर महत्वाच्या बातम्या: