Sumit Pusavale : 'बाळूमामा' (Balumama) या सुपरहिट मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता सुमित पुसावळे (Sumit Pusavale) आता 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत तो 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. सुमितने 'बाळूमामा' सोडल्यानंतर त्याने ही मालिका का सोडली असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता नव्या मालिकेसाठी त्याने ही मालिका सोडली असल्याचं समोर आलं आहे.


एबीपी माझासोबत बोलताना सुमित पुसावळे म्हणाला,"घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेसाठी मला विचारणा झाली तेव्हा मी नोटीस पिरियडवर होतो. चॅनलने मला 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतलं पात्र व्यवस्थित समजावलं. कथा समजावून सांगितली. त्यावेळी या मालिकेतील कथा, पात्र खूप आपलेसे वाटले. पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे, असा विचार करत मी ही मालिका करण्याचा निर्णय घेतला".


सुमित पुढे म्हणाला,"मला असं वाटतं की अनेक मालिका येतात जातात. पण एखादी मालिका टर्निंग पॉईंट ठरते. आता ही मालिका माझ्यासाठी सेंकड टर्निंग पॉईंट ठरू शकते. 'कहानी घर घर की' या मालिकेचा 'घरोघरी मातीच्या चुली' मराठी रिमेक असल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर मी त्या मालिकेचे काही एपिसोड पाहिले. पण दोन्ही मालिकांचे कथानक हे वेगळे आहेत". 


'घरोघरी मातीच्या चुली' ही रेश्मा शिंदेला कशी मिळाली? 


एबीपी माझाशी बोलताना रेश्मा शिंदे म्हणाली,"रंग माझा वेगळा' ही मालिका करताना मला अपेक्षा नव्हती की सावळ्या मुलीची गोष्ट आणि तिची लव्हस्टोरी हा एवढा संवेदनशील विषय लोकांना भावेल. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळेल. या मालिकेनंतर मी कोणत्या नव्या प्रोजेक्टचा भाग होणार याची माझ्यासह प्रेक्षकांनादेखील उत्सुकता होती. दरम्यान चॅनलने मला 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेसाठी विचारलं".


रेश्मा पुढे म्हणाली,"घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत मी साकारत असलेली मुलगी खूप शिकलेली आहे. पण कुटुंब सांभाळणं हा निर्णय तिचा आहे. प्रत्येक करिअरप्रमाणे गृहिणीदेखील एक करिअरच आहे. ते पेलणं अवघड आहे. अनेक स्त्रिया दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. पण मला माझ्या कुटुंबाच्या राहायचं आहे. गोल्ड मेडलिस्ट सून ते गृहिणी असा हा प्रवास आहे". 


'कहानी घर घर की'चा मराठी रिमेक?


रेश्मा म्हणाली,"घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका 'कहानी घर घर की'चा मराठी रिमेक नाही. प्रोमो आऊट झाल्यानंतर रिमेकबदद्ल बोललं गेलं तेव्हा आम्हाला हसू आलं. प्रेक्षकांच्या मताचा आदर आहेच. पण आधी मालिका पाहा. रेश्मा-सुमितच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे".



संबंधित बातम्या


Gharoghari Matichya Chuli : बाळूमामा नंतर स्टार प्रवाहच्या नव्या कोऱ्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार सुमीत पुसावळे, प्रोमो आला समोर