Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay asta) या मालिकेत सध्या पुनर्जन्माच्या कथेचा सिक्वेल सुरु आहे. जयदीप आणि गौरी यांचा पुनर्जन्म झाला असून ते नित्या आणि अधिराज म्हणून आले आहेत. दरम्यान शालिनी शिर्के पाटीलसुद्धा आता भारतात असून अधिराजच्या लग्नाची घाई सुरु आहे. पण नित्या म्हणजेच गौरीला आता मागचं सगळं आठवलं असून ती अधिराजला देखील ते सगळं आठवून देण्याचा प्रयत्न करते.
पण सध्या मालिकेत हे जे काही सुरु आहे, त्यावर प्रेक्षकांची बरीच नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला. त्यामध्ये गौरीने जे काही केलं होतं, तेच पुन्हा नित्या करताना दिसत आहे. मालिकेत सध्या याच गोष्टी दाखवल्या जात असून प्रेक्षकही बरेच नाराज आहेत. अनेकांनी या प्रोमोवर कमेंट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मालिकेचा नवा प्रोमो काय?
मालिकेचा नवा प्रोमो शेअर करत त्याला नित्याच गौरी असल्याची शालिनीला खात्री पटली आहे, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. यामध्ये नित्या माती उकरत असते, तर शालिनी तिला दुरुनच पाहत असते. लांब असल्यामुळे ती काय बोलत असते हे शालिनीला कळत नसतं. अशीच माती गौरीने देखील उकरली होती, जेव्हा जयदीपला पुरण्यात आलं होतं. तेवढ्यात तिथे माई आणि शेखर भावोजी येतात आणि तिला काय करतेस असं विचारतात. ते पाहून शालिनीला धक्का बसतो.
त्यानंतर नित्या त्यांना सांगते की आपला जयदीप इथे आहे. हे ऐकून शालिनी हादरते. त्यानंतर माई, शेखर आणि नित्या तिघेही ती माती उकरायला लागतात. तेव्हा माई आणि शेखर जिवंत असल्याचंही शालिनीला कळतं आणि हे दोघे मिळून नित्याला मदत करतायत, असं शालिनी म्हणते. त्या मातीमध्ये जयदीप असतो. तो सापडल्यानंतर गौरी त्याला जवळ घेते आणि जोरात ती जयदीप असं ओरडते. तेव्हा शालिनीला नित्यानेच गौरीचा पुनर्जन्म घेतला असल्याची खात्री शालिनीला पटते.
प्रेक्षकांचा संताप
हा सगळा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. एकाने यावर कमेंट करत म्हटलं की, आता पुन्हा जन्म, पुन्हा जन्म हे म्हणजे मी पुन्हा येईन, पुन्हा येईन सारखं आहे. त्यामुळे मालिकेच्या या सिक्वेलवर प्रेक्षकांची तीव्र नाराजी असल्याचं म्हटलं जातंय.