मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त 'पहरेदार पिया की' ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आहे. ही मालिका अखेर बंद करण्यात आली आहे. मालिकेचा एपिसोड काल (28 ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही.


मालिका अचानक बंद झाल्याने मालिकेची कलाकार आणि क्रू यांना धक्का बसला आहे. मालिकेत लीप दाखवला जाईल असा विचार त्यांनी केला होता. परंतु मालिकाच बंद झाल्याने सगळ्यांना झटका बसला आहे.

सोमवारी या मालिकेच्या सेटवर शांतता होती. त्यामुळे सरकारने या मालिकेवर बंदी घालण्याचा निर्णय तर घेतला नाही ना, अशी शंका वर्तवली जात आहे.

या मालिकेत 12 वर्षांचा लीप येईल, असं वृत्त दोन दिवसांपूर्वी होतं. या लीपनंतर 9 वर्षांचा मुलगा 21 वर्षाचा होईल, जेणेकरुन 'बालविवाह'चा आक्षेप आपोआपच निघून जाईल. परंतु ताज्या माहितीनुसार, मालिकेचं चित्रीकरण थांबलं आहे.

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिकेविरोधात अखेर कारवाई


‘पहरेदार पिया की’ ही मालिका कथानकामुळे सुरुवातीपासूनच वादात अडकली आहे. एका 18 वर्षांच्या तरुणीचं 9 वर्षांच्या मुलासोबत लग्न होतं. नुकत्याच झालेल्या काही एपिसोडमध्ये सुहागरात तसंच कुंकू लावण्याचे सीन दाखवले होते. यावर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला होता.

‘पहरेदार पिया की’ मालिकेविषयी रोष निर्माण झाल्याने मानसी जैन नावाच्या एका तरुणीने change.org वेबसाईटवर याचिका दाखल केली होती. ही मालिका तातडीने बंद करा अशी मागणी या याचिकेद्वारे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर स्मृती इराणी यांनी मागणीचा विचार करत ब्रॉडकास्टिंग कन्टेंट कम्पलेंट्स काऊन्सिलकडे हे प्रकरण सोपवून बीसीसीसीला या मालिकेवर तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला होता.

स्मृती इराणींची ‘पहरेदार पिया की’विरोधात कारवाई, मालिका बंद होणार?

बीसीसीसीने सोनी वाहिनीला मालिकेची वेळ बदलण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे आता ही मालिका रात्री 8.30 ऐवजी रात्री 10.30 वाजता प्रसारित होत होती. याशिवाय मालिका सुरु असताना ‘ही मालिका बालविवाहाला प्रोत्साहन देत नाही’, अशा आशयाची पट्टी चालवावी, असे निर्देशही देण्यात आले होते.

आता ही मालिकाच बंद करण्यात आली आहे.