Ashok Saraf: प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना मराठी चित्रपटसृष्टी ही लाडानं 'मामा' असं म्हणते. अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयानं आणि उत्तर कॉमिक टायमिंगनं अशोक सराफ हे प्रेक्षकांची मनं जिंकतात. अशोक सराफ यांचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. नुकताच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रोमोमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddarth Jadhav) हा अशोक सराफ यांचा हार घालून सन्मान करताना दिसत आहे.
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, सिद्धार्थ हा स्टेजवरुन खाली येऊन अशोक सराफ यांना फुलांचा हार घालतो. या प्रोमोमध्ये झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेले मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार भावूक झालेले दिसत आहेत.
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याच्या आणखी एका प्रोमोमध्ये अभिनेता सुबोध भावे हा अशोक सराफ यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. सुबोध म्हणतो, 'मराठी सिनेमा म्हणजे 'अशोक सराफ' जिथे काम करतात ती इंडस्ट्री. अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचं स्वप्न ही तर खूप लांबची गोष्ट झाली, मला फक्त त्यांना जवळून बघायची इच्छा होती. अशोक सराफ यांच्या कामतून आम्ही प्रेरणा घेतली. आमच्या सर्वांकडून अशोक सराफ यांना मानाचा मुजरा.' झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा 26 मार्च रोजी प्रेक्षक पाहू शकतात.
अशोक सराफ यांचे चित्रपट
आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत आणि अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी काम केलं आहे. कोयला, सिंघम, करण अर्जुन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केलं. अशोक सराफ यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. ‘मी बहुरुपी’ या पुस्तकात अशोक सराफ यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Ashok Saraf : अशोक सराफ असं काही बोलले की राज ठाकरे यांनी लावला डोक्यालाच हात