मुंबई : 'मुंबईला कामगारांचा शाप आहे' असा मजकूर असलेले बॅनर मुंबईत अनेक ठिकाणी लागलेले आपण सध्या पाहतोय. हे बॅनर लागल्यापासून सर्वांना प्रश्न पडले की, हे बॅनर कोणी लावले आहेत? हे बॅनर्स लावण्यामागचा उद्देश काय? गेले काही दिवस याचीच चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. परंतु या बॅनरमागचं रहस्य आता उलगडले आहे. आज रात्री 8 वाजता यशवंत नाट्यमंदिर येथे 'तोडी मिल फॅन्टसी' या नाटकाचा प्रयोग होणार आहे. हे बॅनर्स या नाटकाची जाहिरात करण्यासाठी लावले आहेत.


'तोडी मिल फॅन्टसी' हे नाटक मिल कामगारांच्या आयुष्याशी निगडीत आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून मुंबईतील गिरणगावात 'मुंबईला कामगारचा शाप आहे' असा मजकूर असलेले बॅनर्स आणि पोस्टर्स लावून नाटकाच्या टीमने या नाटकाचा प्रचार केला. या हटके प्रचारामुळे कामगारवर्ग, मुंबईकर आणि माध्यमांचे या बॅनर्सने लक्ष वेधून घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या बॅनर्सची मुंबईकरांसह सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या परळ, दादर चिंचपोकळी, गिरगाव, महालक्ष्मी अशा अनेक भागात हे बॅनर्स लावलेले पाहायला मिळत आहेत. हे बॅनर अशा ठिकाणी लावले आहेत जिथे कामगार राहतात किंवा त्यांचे कधी काळी तिथे कामगारांचे वास्तव्य होते. हे बॅनर्स लावल्यापासून मुंबईत सर्वत्र पुन्हा एकदा कामगारांवरील अन्यायाबाबत चर्चा होऊ लागली आहे.