सांगली : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगलीच्या आटपाडीमध्ये भव्य नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून 13 कोटी 65 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात हे नाट्यगृह उभारण्याचा संकल्प आहे.


सांगलीच्या आटपाडीचे सुपुत्र असणारे, महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी व प्रसिद्ध साहित्यिक ग.दि.माडगूळकर यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्ताने आटपाडीमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती खानापूर - आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी दिली आहे.

तसेच गेल्या अनेक वर्षांपासून आटपाडीकरांची इच्छा होती की, आटपाडीमध्ये गदीमांच्या नावाने एक नाट्यगृह उभारण्यात यावे. सरकारकडून आटपाडी येथे ग.दि. माडगूळकर यांच्या नावाने भव्य नाट्यगृह उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे. अशा पद्धतीचे पहिलेच नाट्यगृह राज्यात तालुकास्तरावर उभे राहणार आहे.

या नाट्यगृहासाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचे स्थानिक आमदार बाबर यांनी सांगितले. या पैशातून भव्य आणि सुसज्ज असे नाट्यगृह उभारले जाईल. नाट्यगृहाच्या भींतीवर गदिमांच्या काव्यपंक्ती, चित्रे, गदिमांचे बंधू व्यंकटेश माडगूळकर यांचे साहित्य पाहायला मिळणार आहे. तसेच डॉ. शंकरराव खरात यांचे साहित्य दालन, चित्रफित संग्रहालय आदी उभारले जाणार आहे.