मुंबई : पनामा पेपर्स लिक प्रकरणात बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचं नाव समोर आल्याचं प्रकरण ताजं असतानाच, आता बिग बी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. 2001 मधील कौन बनेगा करोडपती या क्विझ शोच्या मिळकतीवरुन सुप्रीम कोर्टाने आयकर विभागाला टॅक्स केस रिओपन करण्यास संमती दिली आहे.

 
केबीसीची मिळकत आणि कर यांच्यातील तफावतीमुळे 2001 मध्ये अमिताभ बच्चन यांच्याविरोधात केस करण्यात आली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने बच्चन यांना दिलासा दिला होता. त्यानंतर आयकर विभागाने हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.

 
बच्चन यांना कौन बनेगा करोडपतीच्या सूत्रसंचालनासाठी मिळालेल्या मानधनाची खरी रक्कम त्यांनी उघड केली नसल्याचा दावा इन्कम टॅक्स विभागाने केला होता.

 
आयटीच्या कलम 80 आरआर अन्वये कलाकार म्हणून करातून सूट देण्याची बिग बींची मागणी मुंबई हायकोर्टाने मान्य केली होती. त्यानुसार बिग बींच्या 50.92 कोटी रुपये मानधनाच्या 30 टक्के रकमेवर सूट दिली होती.