मुंबईतील अंधेरी भागात शनिवारी भरदिवसा हा प्रकार घडल्याची माहिती आहे. खुद्द रुपालीनेच ट्विटरवरुन या घटनेची माहिती दिली आहे.
रुपाली आपल्या महिला मदतनीसासोबत मुलाला शाळेत सोडण्यासाठी चालली होती. वर्सोवा भागातील भारत नगर सिग्नलजवळ सकाळी 8 वाजताच्या सुमारास रुपालीची गाडी थांबली होती.
रुपालीच्या मुलाने तिचा मोबाईल घेतला, त्याला थांबवताना ब्रेकवरुन तिचा पाय सरकला आणि गाडी थोडीशी पुढे गेली. त्यामुळे तिच्या कारचा धक्का एका बाईकला लागला. यामुळे बाईकवार संतापले आणि त्या दोघांनी रुपालीला शिवीगाळ करायला सुरुवात केली.
'फार काही झालेलं नाही. इतकी काय ओव्हरअॅक्टिंग करता?' असं आपण म्हणाल्याचं रुपाली सांगते. बाईकस्वारांची माफी मागितल्याचंही ती म्हणाली. 'ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एकाने माझ्या गाडीच्या काचेवर इतक्या जोराने मारलं की काच फुटली.' असंही पुढे रुपालीने सांगितलं.
गाडीची काच लागल्यामुळे रुपालीच्या हातातून रक्त येत होतं. 'इतका राग कशाला आलाय?' असं मी विचारताच तो मागच्या बाजूला गेला. कदाचित गाडीची मागची काच फोडण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण मी तात्काळ गाडी पुढे नेली, असंही रुपालीने सांगितलं.
रुपालीने या घटनेची तक्रार जवळच्या पोलिसात केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी दोन्ही आरोपींच्या आईही सोबत होत्या. 'तुम्हीपण एक आई आहात, आमच्या मुलांना माफ करा' असं त्या म्हणाल्याचं रुपाली सांगते.
पोलिसांनी आपल्याला मदत केल्यामुळे रुपालीने त्यांचे आभार मानले. मात्र घटनेवेळी सर्व पादचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने 'मुंबई स्पिरीट'वरही तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.