Vaibhavi Upadhyay Passes Away : 'साराभाई वर्सेस साराभाई' (Sarabhai vs Sarabhai) फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं (Vaibhavi Upadhyay) निधन झालं आहे. कार अपघातात अभिनेत्रीचं निधन झालं आहे. वयाच्या 32 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे. हिमाचल प्रदेशामध्ये कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला आहे. आता चंडिगडहून कुटुंबीय तिचं पार्थिव मुंबईत आणत आहेत. तिच्या पार्थिवावर आज (24 मे 2023) सकाळी 11 वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 


जेडी मजेठिया यांनी दिला अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीला दुजोरा


वैभवीच्या (Vaibhavi Upadhyay) निधनाच्या बातमीला 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेचे निर्माते जेडी मजेठिया (JD Majethia) यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे,"आयुष्य खूप विचित्र आहे. 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेत वैभवी जस्मिनच्या भूमिकेत होती. या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली आहे. वैभवी एक उत्कृष्ट अभिनेत्री होती. आता रस्ते अपघातात माझ्या मैत्रिणीचं निधन झालं आहे. सकाळी 11 च्या सुमारास तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत". 






सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून शोक व्यक्त 


'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीनेदेखील वैभवीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेत रुपालीने वैभवीसोबत काम केलं होतं. रुपालीने वैभवीचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे,"वैभवी खूपच लवकर".  


मीडिया रिपोर्टनुसार, वैभवी तिच्या पतीसोबत हिमाचलमध्ये प्रवास करत होता. दरम्यान रस्ते अपघातात अभिनेत्रीचा मृत्यू झाला. वैभवीच्या निधनाने सेलिब्रिटींसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. 






वैभवीने 2020 साली दीपिका पादुकोणसोबत 'छपाक' आणि 'तिमिर' (2023) या सिनेमांमध्ये काम केलं होतं. अनेक गुजराती नाटकांमध्येही तिने काम केलं आहे. 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेसह 'क्या कसूर है अमला का' आणि 'प्लीज फाइंड अटॅच्ड' या सीरिजमध्ये काम केलं आहे. 


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 24 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!